भांडवली बाजारातून बाहेर पडण्याच्या वाटेवर असलेल्या खासगी तेल व वायू क्षेत्रातील एस्सार ऑइलचे समभागमूल्य वर्षभरात दुप्पट झाले आहे. अर्थात याचे सर्वाधिक लाभार्थी सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ठरले आहे. भांडवली बाजारातून बाहेर पडण्यासाठी एस्सार ऑइलने १५ ते २१ डिसेंबर दरम्यान ९.२६ कोटी समभाग उपलब्ध करून दिले होते. याउलट त्याच्या १०.१ कोटी समभागांसाठी मागणी नोंदली गेली. त्यात एलआयसीचे सर्वाधिक १.९८ कोटी समभाग असल्याने कंपनीने ५०० कोटी रुपये जमा केले. एस्सार ऑइलचा चटई दर प्रति समभाग १४६.०५ रुपये असताना मागणी प्रति समभाग २६२.८० रुपयांची नोंदली गेली. वर्षभरापूर्वी कंपनीचे समभागमूल्य १०६.४५ रुपये होते. तर ९८ रुपये हा त्याचा वर्षांतील तळ यंदाच्या जूनमध्ये नोंदला गेला होता. २०१५ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स ५ टक्क्यांनी वाढला असताना एस्सार ऑइलचे समभागमूल्य मात्र तब्बल ९७ टक्क्यांनी उंचावले आहे. एस्सार समूहातील एस्सार पोर्ट्स ही कंपनी यापूर्वी सूचीतून बाहेर पडली आहे.