हप्ता थकल्याने पोर्तुगालच्या बॅन्को एस्पिरिटो सॅन्टो या बँकेच्या वित्तीय स्थितीबाबत आंतरराष्ट्रीय आर्थिक स्तरावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बाजारमूल्याबाबत त्या देशातील ही सर्वात मोठी भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपनी आहे. देशातील वित्तीय व्यवस्थेत तिचा सक्रिय सहभाग आहे. कंपनी निर्भर असलेल्या एस्पिरिटो सॅन्टो फायनान्शिअल समूहात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. समूहाबाबत लेखापरीक्षणाच्याही शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत. समूहामार्फत जारी केलेले कर्ज बँकेने विकले आहे. मात्र समूह त्यांच्या काही कर्जदारांना रक्कम देऊ शकलेला नाही. यामुळे एकूणच युरोपातील भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक व्यवहारात काहीसे घसरले. दिवसअखेर मात्र त्यांनी किरकोळ एक टक्क्याच्या आतील वाढ राखली. बॅन्को एस्पिरिटो सॅन्टोचे व्यवहारही तिच्या प्रमुख प्रवर्तित समूहामुळे १९ टक्क्यांपर्यंत स्थानिक भांडवली बाजारात घसरले होते. युरो झोनमध्ये समावेश असलेल्या पोर्तुगालने गेल्याच महिन्यात सहा अब्ज युरोची आर्थिक सहाय्यता बँक क्षेत्राला उपलब्ध करून दिली आहे.