नजीकच्या कालावधीत अन्नधान्याच्या दरवाढीचे मात्र सावट; रिझव्‍‌र्ह बँकेकडून अधिक व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त
घाऊक महागाई निर्देशांकांवर आधारित महागाईचा दर मार्च २०१६ मध्येही उणे स्थितीत राहिला आहे. (-)०.८५ टक्के दर राहताना तो गेल्या १७ व्या महिन्यात या स्थितीत राहिला आहे.

फेब्रुवारीत हा दर (-)०.९१ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, मार्च २०१५ मध्ये तो (-)२.३३ टक्के नोंदला गेला. नोव्हेंबर २०१४ पासून तो सतत उणे स्थितीत प्रवास करत आहे. जानेवारीतील सुधारित दर (-)१.०७ टक्के आहे. घाऊक किंमत निर्देशांकात अन्नधान्याच्या महागाईचा दर मार्चमध्ये ३.७३ टक्के राहिला असून फेब्रुवारीमधील ३.३५ टक्क्य़ांच्या तुलनेत तो किरकोळ वधारला आहे. यापुढे तो वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात भाज्यांचे दर (-)२.२६, इंधन व ऊर्जेचे दर (-)८.३० टक्के तर निर्मित वस्तूंचे दर (-)०.१३ टक्के राहिले आहेत. कांदे, फळांच्या दरांमध्ये काहीशी नरमाई आली असून ते अनुक्रमे १७.६५ व २.१३ टक्के राहिले आहेत.  मार्चमधील किरकोळ महागाई दर ५ टक्क्य़ांखाली (४.८३%) विसावल्याचे गेल्याच आठवडय़ात स्पष्ट झाले होते. गेल्या सहा महिन्यांच्या तळातील त्याचे स्थान होते. संपूर्ण वर्षांसाठी ५ टक्क्य़ांचा महागाई दराचा अंदाज वर्तविणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने चालू महिन्याच्या सुरुवातीलाच रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात पाव टक्याची कपात केली होती. (उणे प्रवास कायम राखणाऱ्या महागाई दरानंतर उद्योग वर्तुळातून पुन्हा एकदा रिझव्‍‌र्ह बँकेमार्फतच्या दर कपातीची मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण वर्षभरात एक टक्क्य़ांपर्यंतची ती व्हावी, अशी अपेक्षा आता

वित्त वर्षांत महागाई दर ४.९ टक्के : सिटीग्रुप

चालू आर्थिक वर्षांत भारताचा किरकोळ महागाई दर ४.९ टक्के राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था सिटीग्रुपने व्यक्त केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून पाव ते अध्र्या टक्क्य़ांची दर कपात अपेक्षित करणाऱ्या सिटीग्रुपने एकूण वित्तवर्षांत प्रत्यक्ष बँकांही त्यांचे कर्ज अधिक स्वस्त करू लागतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

यंदा व्याजदर कपात अनिवार्य : एसबीआय रिसर्च

यंदा अपेक्षित असलेला चांगला मान्सून रिझव्‍‌र्ह बँकेला अध्र्या टक्क्य़ांपर्यंतची कपात करण्यास भाग पाडेल; महागाईचा उतार येत्या काळात आणखी दिसेल, असा विश्वास एसबीआय रिसर्चने व्यक्त केला आहे. भारताचा विकास दर वाढता राहणार असून महागाईदेखील कमी होऊ शकेल, असे नमूद करण्यात आले आहे.

मार्च २०१७ अखेर दर ४.८ टक्के असेल : बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच

आर्थिक वर्षअखेर महागाईचा दर ४.८ टक्के असेल, असे अंदाजित करतानाच रिझव्‍‌र्ह बँक आगामी पतधोरणात किमान पाव टक्का तरी दर कपात करेल, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने म्हटले आहे. महागाई कमी होत आहे; त्याचबरोबर देशाच्या विकास दराला चालना देण्यासाठी ही दर कपात आवश्यक ठरेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी व्याजदर कपात करावी..

व्यक्त होत आहे.

यंदा मान्सून चांगला होण्याची अपेक्षा आहेच. शिवाय जागतिक स्तरावरील खाद्यान्यादींच्या किंमतीही स्थिरावत आहेत. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेला आणखी दर कपात करण्यास वाव आहे.

– सीआयआय.

महागाई निर्देशांकात अन्नधान्यावरील भाववाढीचा दबाव कमी होत आहे. भाज्या, फळांचे दर स्थिरावत आहेत. यंदा पाऊस अपेक्षित असताना व्याजदर कपात हवी, हिच अपेक्षा आहे.

– फिक्की.

डाळींचे दर चढेच..

अन्नधान्य, खाद्यान्यांमध्ये डाळींचे भाव चढेच राहिल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मार्चमधील घाऊक महागाई दरातून स्पष्ट झाले आहे. मार्चमध्ये डाळींचे दर ३४.४५ टक्क्य़ांवर पोहोचले आहेत. जानेवारी २०१५ पासूनच डाळींचे दर दुहेरी आकडय़ात राहिले आहेत.

तुरीसारख्या डाळीने २०१५ मधील ऐन दिवाळीच्या सणांमध्ये किलोमागे २०० रुपयांची वेस गाठल्याने खरेदीदारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. यानंतर देशपातळीवर डाळीच्या साठेबाजीवरही कारवाई करण्यात आली होती.

घाऊक महागाईचा दर सलग १७ व्या महिन्यात उणे राहिला असला तरी डाळींचे दर यंदाही दुहेरी आकडय़ापर्यंत पोहोचले आहेत. जानेवारी २०१५ मध्ये ते १२.५६ टक्के होते. तर नोव्हेंबर २०१५ मध्ये सर्वोच्च अशा ५८.०९ टक्क्य़ांवर गेले होते.