सरकारचा नियोजित खर्च अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे व नियत कालावधीप्रमाणेच होईल, असा निर्वाऴा देत चालू आर्थिक वर्षांच्या उर्वरित कालावधीत खर्चात कोणतीही कपात केली जाणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिली.

केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने विविध १५ क्षेत्रांतील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा शिथिल करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर जेटली प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या वर्षभरात देशातील थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ हा ४० टक्क्यांनी वाढला असून अधिक गुंतवणुकीसाठी अर्थव्यवस्थेतील चक्र अधिक गतीने फिरणे गरजेचे असल्याचेही जेटली यांनी सांगितले.
सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे देशात व्यवसायपूरक वातावरण अधिक प्रमाणात तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.
एकदम १५ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारण्याच्या माध्यमातून सरकारने एक धाडसी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया ‘भारतीय औद्योगिक महासंघा’(सीआयआय)ने दिली आहे.
आर्थिक सुधारणा केवळ सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेतच नाही तर त्या राबविण्याच्या दिशेने ठोस पावले पडत असल्याचे हे द्योतक असल्याचे महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे. शेअर बाजार तसेत उद्योगांसाठी ही सरकारकडून मिळालेली दिवाळी भेट असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे तमाम उद्योग, संघटना यांनी स्वागत केले आहे.