जोमाने विस्तारत असलेले स्थावर मालमत्ता क्षेत्र बरोबरीने किरकोळ विक्री व आदरातिथ्य क्षेत्राच्या विस्तारत असलेल्या कक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब, लोकांचे उंचावलेले जीवनमान, मॉल्स, विमानतळे, रुग्णालये व अन्य सामाजिक सुविधा स्थळी वाढती वर्दळ यातून व्यावसायिक सुविधा व्यवस्थापन अर्थात फॅसिलिटी मॅनेजमेंट सेवांना मागणी वाढत असून, २०२० सालापर्यंत या क्षेत्रातून सुमारे १९.५ अब्ज डॉलरची उलाढालीची अपेक्षा या उद्योगक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

सुविधा व्यवस्थापनाच्या सेवा या केवळ इमारत अथवा वास्तूच्या देखभाल व स्वच्छतेपुरत्या मर्यादित राहिल्या नसून, बदलत्या काळानुरूप या सेवांची व्याप्ती प्रचंड वाढत आली आहे. आज कोणतेही उद्योग-आस्थापना त्यांच्या मूळ व्यावसायिक उपक्रमाव्यतिरिक्त अन्य सर्व कामे ही बाहेरून त्रयस्थ व्यावसायिकांकरवी करून घेते आणि यातून सुविधा व्यवस्थापनाच परीघ गेल्या पाच-सात वर्षांत विलक्षण विस्तारला आहे, असे जेएलएलचे व्यवस्थापकीय संचालक (एकात्मिक सुविधा व्यवस्थापन) संदीप सेठी यांनी नमूद केले. जेएलएलच्या भागीदारीने यूबीएम इंडियाद्वारे आयोजित या क्षेत्रातील वाहिलेल्या देशातील पहिल्या ‘वर्ल्ड ऑफ फॅसिलिटीज्’ या प्रदर्शन व परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. सोमवारी उद्घाटन झालेले हे प्रदर्शन बुधवार, २६ एप्रिल सायंकाळपर्यंत गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन संकुलात सुरू असेल.

पर्यावरणविषयक वाढत्या जागृतीतून, भविष्यासाठी ऊर्जा व अन्य संसाधनाच्या जतनाची जाणीव वाढली असून कंपन्यांचे हे हरित उपक्रमही एकात्मिक सुविधा व्यवस्थापनाचे भाग बनत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक कार्यालयांमध्ये स्वास्थ्य व समुपदेशन उपक्रम, योग व ध्यान धारणा अगदी संकुलातील मंदिरातील पूजा-अर्चनेसाठी पुजाऱ्यांची मागणीही येऊ लागली आहे, असे सेठी यांनी स्पष्ट केले. दरसाल किमान १५ टक्के दराने आगामी तीन वर्षे हे प्रगती साधेल, असा त्यांचा कयास आहे.

क्षेत्राला वाहिलेल्या पहिल्या प्रदर्शनात २०० हून अधिक क्षेत्रातील भारतीय व विदेशी नाममुद्रांचे प्रतिनिधित्व करणारी १०० दालन, ६,७०० हून अधिक व्यावसायिक भेटकर्त्यांकडून झालेली नोंदणी म्हणजे भारतात सुविधा व्यवस्थापन क्षेत्राकडे मोठय़ा आस्थेने पाहिले जाते याचे द्योतक आहे, असे यूबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास यांनी स्पष्ट केले.