अ‍ॅक्सिस बँकेच्या दिल्लीतील शाखेवर प्राप्तिकर विभागाचा छापा

निश्चलनीकरणाच्या कालावधीत तब्बल ४४ बनावट बँक खाती आणि त्यामध्ये सुमारे १०० कोटी रुपये जमा झाल्याच्या घटनेने शुक्रवारी खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक अधिक चर्चेत आली. या प्रकरणात बँकेच्या नवी दिल्लीतील चांदनी चौक शाखेवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेही टाकले.

खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक यापूर्वीही निश्चलनीकरणा दरम्यानच सोन्याच्या विटांमुळे चर्चेत आली आहे. जुन्या नोटांच्या बदल्यात अधिक संख्येने नव्या नोटा मिळण्याकरिता बँकेच्या दिल्लीतील काश्मिरी गेट शाखा व्यवस्थापकांना खातेदाराने सोन्याच्या विटा भेट दिल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. या प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे.

बँकेत कंपनी सुशासनाबाबत उच्च दर्जा राखला जात असून त्यात कर्मचाऱ्यांमार्फत होणारी हयगय स्वीकारली जाणार नाही, असे अ‍ॅक्सिस बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले. प्राप्तिकर विभागाच्या नवी दिल्लीतील शाखेवरील कारवाईप्रकरणी बँक व्यवस्थापन तपासासाठी सहकार्य करत असून दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही बँकेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अ‍ॅक्सिस बँकेने तिच्या काश्मीर गेट (नवी दिल्ली) शाखेतील ६ अधिकाऱ्यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. तर गैरप्रकार करणाऱ्या १९ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याचे कळते. निश्चलनीकरणाच्या कालावधीतील बँकेची ही कारवाई आहे.

प्राप्तिकर विभागाच्या ताज्या कारवाईत अ‍ॅक्सिस बँकेच्या नवी दिल्लीतील चांदनी चौक शाखेमध्ये सुरू करण्यात आलेल्या ४४ बनावट बँक खात्यांचा तपास करण्यात आला. त्यात १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्यानंतर बँकेच्या शाखा, कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. निश्चलनीकरण कालावधीत बँकेच्या नवी दिल्लीतील चांदनी चौक शाखेतील एकूण बँक खात्यात ४५० कोटी रुपये जमा झाल्याचे समजते.