मुंबई शेअर बाजाराने सलग घसरणीचे पाचवे सत्रही बुधवारी अनुभवले, तर राष्ट्रीय शेअर बाजारात किरकोळ वाढ नोंदविली. २०.१० अंश घसरणीसह ‘सेन्सेक्स’ १९,६३९.७२ पर्यंत खाली आला; ‘निफ्टी’ २.३० अंश वाढीसह ५,९५९.२० वर गेला.
दिवसभरात मंगळवारच्या तुलनेत शतकी वाढ राखत ‘सेन्सेक्स’ला १९,७६७.२५ या दिवसाच्या उच्चांकावर नेऊन ठेवणाऱ्या प्रमुख भांडवली बाजारात नफेखोरीच्या दृष्टीने एनटीपीसी, कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोसारख्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने दिवसअखेर मात्र मुंबई निर्देशांकाने किरकोळ वाढ राखली.
खुल्या समभाग विक्रीमुळे चर्चेत असलेल्या एनटीपीसी आणि ऑईल इंडियाच्या समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली. दिवसअखेर एनटीपीसीचे समभाग मूल्य २.१२ टक्क्यांनी तर ऑईल इंडियाचे समभाग मूल्य ०.२३ टक्क्यांनी खालावले. ऑईल इंडियाच्या भागविक्रीला चांगला प्रतिसाद लाभला होता. तर बँक क्षेत्रात आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग मूल्य ०.६२ ते १.०८ टक्क्यांपर्यंत घसरले होते. लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, भेल हे बडे समभागही १.२३ ते १.७२ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवित होते. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी १८ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. गेल्या सलग पाच सत्रातील घसरणीमुळे ‘सेन्सेक्स’ ३६० अंशांनी खाली आला आहे. मुंबई निर्देशांकाने कालच्या व्यवहारात महिन्याचा नीचांक नोंदविला होता. तर ‘निफ्टी’ गेल्या चार सत्रातील घसरण  रोखत आज अवघ्या २.३० अंशांची वाढ नोंदविली.
सकाळीच सुरू झालेल्या आशियाई बाजारात तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री उशिरा सुरू झालेल्या भांडवली बाजारात तेजी नोंदली गेली.
‘एनटीपीसी’ : आज भागविक्री
बुधवारचा बंद भाव : रु १५२ ( २.१२%)
वर्षांतील उच्चांक :    रु. १९०.३०
वर्षांतील नीचांक :    रु. १३८.९५
भागविक्रीसाठी निश्चित किंमत :    रु. १४५
उद्यापासून (गुरुवार) एनटीपीसीमधील सरकारचा ९.५ टक्के हिस्सा कमी करण्यासाठी खुल्या भागविक्रीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे; प्रती समभाग रु. १४५ भागविक्रीचे मूल्य जाहीर करण्यात आले आहे.