अर्थव्यवस्थेवर मंदीचे स्पष्ट सावट, तर त्या परिणामी बँकांची पतगुणवत्ता ढासळलेली आणि उत्तरोत्तर नवनवीन कर्जखात्यांची बुडीतात भर पडत जाणे.. असा सरलेला खडतर काळ आणि त्याची आठवणही बहुतांश बँकांसाठी निश्चित नकोशी असेल. परंतु कसदारपणाची प्रचिती या अशा प्रतिकूल काळातून दिली जाते आणि २०१२-१३ मधील अशा मलूल वातावरणातही आपली बावनकशी कणखरता दाखवत, बहुरंगी कामगिरी करणाऱ्या काही बँका नक्कीच होत्या.
या अशा आठ सर्वोत्तम बँकांचाच गौरव ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’कडून शुक्रवारी होणाऱ्या सोहळ्यात केला जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत होत असलेल्या या ‘एफई बेस्ट बँक्स पुरस्कारां’चे वितरण केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते केले जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील.
बँकांमध्ये चढाओढ लागावी अशा एफई बेस्ट बँक पुरस्कारांना या क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. २०१२-१३ सालासाठी या पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या मानक ऱ्यांमध्ये नव्या पिढीच्या खासगी बँकांमधून एचडीएफसी बँक, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वर्गवारीतून बँक ऑफ बडोदाने बाजी मारली आहे.
नफाक्षमता आणि कार्यक्षमता अशा दोन वर्गवारीच्या पुरस्कारांसाठी एचडीएफसी बँकच मानकरी ठरली आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी पुरस्कारांच्या घोषणेबद्दल आनंद व्यक्त करताना, ‘भविष्यातील उज्ज्वलतेबद्दल आपण आजपेक्षा यापूर्वी कधीही इतके आशावादी नव्हतो’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अन्य पुरस्कारार्थीमध्ये विदेशी बँकेच्या वर्गवारीत डॉइशे बँक सर्वोत्तम ठरली आहे. करूर वैश्य बँक सलग चौथ्या वर्षी या पुरस्काराची मानकरी ठरली आहे, तर खासगी बँकांच्या वर्गवारीत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार येस बँकेने पटकावला. तामिळनाड र्मकटाइल बँक, एचएसबीसी (वित्तीय सामथ्र्य व सशक्तता), बीएनपी परिबा (पत गुणवत्ता), बँक ऑफ महाराष्ट्र (वृद्धिप्रवणता) अशा अन्य बँका त्या त्या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ ठरल्या आहेत.
या पुरस्कारार्थीच्या निवडीसाठी काळजीपूर्वक पाहणी केली जाईल याची ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’कडून नेहमीच दखल घेतली जाते. या प्रक्रियेत ईवाय या सल्लागार संस्थेचा सिंहाचा वाटा असून, पुरस्कारार्थीसाठी विविध निकष तिनेच ठरविले आहेत.