व्याजदर कपातीच्या आशा धुळीला!
साखर, भाज्या, खाद्यतेल अशा अन्नधान्यांचे दर चढे राहिल्याने नोव्हेंबरमधील महागाई दर ९.९० टक्क्यांच्या भयंकर पातळीवर गेले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात  किरकोळ महागाई दर १० टक्क्यांनजीक राहिला आहे. ऑक्टोबरमधील वधारत्या औद्योगिक उत्पादनदराने जानेवारीमध्ये व्याजदर कपातीची शक्यता वर्तविली जात असली तरी आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्य-तिमाही पतधोरणात तरी ती होणार नाही, हेच यंदाच्या या महागाईदराने सूचित केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून महागाईचा दर १० टक्क्यांच्या समीप राहिला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये तो अनुक्रमे ९.७३ आणि ९.७५ टक्के राहिल्यानंतर यंदाच्या ऐन दिवाळीच्या महिन्यात तर त्याने कडीच केली. साखर, डाळी, भाज्या, मांसाहारी पदार्थ यांच्या दुहेरी आकडय़ातील किंमतवाढीमुळे ग्राहक किंमत निर्देशांकातील तेलादी विभाग नोव्हेंबरमध्ये कधी नव्हे ते १७.६७ अशा विक्रमी स्तरावर गेले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण येत्या आठवडय़ात, १८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. तर तिसऱ्या तिमाही पतधोरणाचा आढावा २९ जानेवारी रोजी घेतला जाणार आहे. महागाई जोपर्यंत ५ ते ६ टक्के या सहनशील पातळीवर येत नाही तोवर व्याजदर कमी करणार नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे कडवे धोरण आहे.

अर्थतज्ज्ञांचे बोल..
* यंदाच्या उत्साही औद्योगिक उत्पादनदरांकडे रिझव्‍‌र्ह बँकेला पाठ फिरविता येणार नाही. अर्थव्यवस्थेतील निराशा दूर करण्यासाठी व्याजदर कपातीशिवाय मध्यवर्ती बँकेला पर्याय नाही.
वृंदा जहागीरदार,
स्टेट बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ
——————–
* यंदाचे औद्योगिक उत्पादन दराचे आकडे हे खूपच आशादायी आहेत. अर्थव्यवस्था अधिक जोमाने प्रगती करण्यासाठी आता पुढचा कालावधी निर्णायक ठरेल.
ए. प्रसन्ना,
आयसीआयसीआय सिक्युरिटीचे मुख्य अर्थतज्ज्ञ.
——————–
* ऑक्टोबरप्रमाणेच आगामी महिन्यातही औद्योगिक उत्पादनदर वाढत राहिल याबाबत शंका आहे. मात्र एकूणच उर्वरित आर्थिक वर्षांसाठी पूर्वाधापेक्षा तो नक्कीच चांगला राहिल. एकूणात वाढ मात्र तशी थंडच आहे.
सिद्धार्थ संन्याल,
बार्कलेज कॅपिटलचे अर्थतज्ज्ञ
——————–
* सणांच्या मोसमामुळे ऑक्टोबरमधील निर्मितीत वाढ झाली आहे. खरी स्थिती यापुढेच स्पष्ट होईल. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याच्या दृष्टीने जानेवारी ते मार्च २०१३चे तिमाही चित्र खरी कसोटी करेल.
राजीव मलिक,
 क्लासा, सिंगापूरचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ