जगभरात साडेसात हजारांहून अधिक मालमत्ता असलेली सर्वात मोठी हॉटेल शृंखला विंध्याम समूहाचा भारतातील प्रवेश, गेली काही वर्षे मंदावलेल्या देशातील हॉटेल उद्योगाच्या कायापालटाच्या आशाही बळावल्या आहेत. मागील सहा महिन्यांत देशातील हॉटेल उद्योगाची कामगिरी आधीच्या तुलनेत लक्षणीय सुधारली असून, पुढील सहा महिन्यांत या कामगिरीने गती पकडण्याचे अंदाज आहेत.
‘फिक्की’ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार, केंद्रातील नवीन सरकारच्या १८० देशांमधील नागरिकांना आगमनासरशी व्हिसा प्रदान करण्याचे धोरण देशातील आतिथ्य उद्योगाकडे पर्यटकांचा ओघ वाढविण्याच्या दृष्टीने लाभदायी ठरले आहे. याचे प्रतिबिंब हॉटेल उद्योगाच्या ताज्या कामगिरीत उमटल्याचे हा अहवाल सांगतो. नजीकच्या काळात तारांकित हॉटेल्सच्या भाडय़ात वाढ होणार नाही, परंतु खोल्यांचा वापर मात्र २०१४-१५च्या उर्वरित काळात वाढ जाईल. या परिणामी नव्या ग्राहकांना सामावून घेण्यासाठी प्रस्थापित क्षमतेत वाढ होणे क्रमप्राप्त असून, आगामी पाच वर्षांत केवळ बडय़ा महानगरांमधील तारांकित हॉटेल्सच्या खोल्यांच्या संख्येत २३,००० भर पडेल, असा उद्योगाचा अंदाज आहे.
आतिथ्य उद्योगातील या कायापालटाचा सर्वाधिक लाभार्थी हे ऐषारामासह परिषदा, बैठका अशा व्यावसायिकांना भावणाऱ्या दुहेरी सोयी असलेल्या बुटिक हॉटेल्सना होईल, असा फिक्कीचा अंदाज आहे. विद्यमान मोदी सरकारने पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर दिलेला भर आतिथ्य उद्योगाच्या संभाव्य मुसंडीस आणखी हातभार लावणारा ठरेल, असा अहवालाचा निष्कर्ष आहे.
रॉयल पाम्स हॉटेलचे पुनरुज्जीवन
अडीच वर्षांपूर्वी हॉटेल मालमत्तांच्या विक्री व्यवहारासाठी बोलणी सुरू असल्याने चर्चेत असलेल्या, पाम्स हॉटेल अ‍ॅण्ड कन्व्हेंशन सेंटरने दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आपले दरवाजे अतिथींसाठी खुले केले. गोरेगाव पूर्व येथील निसर्गरम्य आरे कॉलनीत वसलेल्या या ४०० खोल्यांच्या पंचतारांकित बिझनेस हॉटेलने नव्या रूपात अनेक अ‍ॅडव्हेंचर पार्कसह नवीन सुविधांचीही भर घातली आहे.  नव्या सरकारकडून दिसलेली धोरण अनुकूलता पाहून आपल्या समूहाने पूर्वीचा निर्णय बदलून, ही मालमत्ता पुनरुज्जीवित करण्याचे ठरविले, असे पाम्स हॉटेल अँड कन्व्हेंशन सेंटरचे सह-व्यवस्थापकीय संचालक दिलवर नॅन्सी यांनी सांगितले. २० छोटे ते मध्यम बैठक खोल्या, इव्हेंट्स, प्रदर्शने, लग्नादी समारंभासाठी तब्बल २००० आसनक्षमता असलेले अत्याधुनिक सभागृह हे या मालमत्तेचे खास आकर्षण असेल, असे त्यांनी सांगितले.