• टीसीएसभागधारकांना श्रीमंत करणार
  • मावळत्या सीईओंची गुंतवणूकदारांना भेट

भांडवली बाजारातील विक्रमी पुनर्खरेदी योजना टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस) ने जाहीर केली आहे. १६,००० कोटी रुपयांची ही प्रक्रिया गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारी ठरणार आहे. सोमवारच्या या घोषणेने एकूणच माहिती तंत्रज्ञान व भांडवली बाजारात तीव्र हालचाल नोंदली गेली.

टाटा समूहातील सुमारे १० अब्ज डॉलरची व देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसने प्रति समभाग २,८५० रुपये दराने सुमारे ५.६१ कोटी समभाग खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. २.८५ टक्का हिस्साखरेदीच्या प्रस्तावाला टीसीएसने सोमवारी मंजुरी दिली.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले एन. चंद्रशेखनर हे कंपनीच्या मुख्य प्रवर्तक, टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे मंगळवारी (२१ फेब्रुवारी) घेणार असताना टीसीएसने सोमवारी समभाग पुनर्खरेदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

कंपनीच्या या निर्णयामुळे देशातील सर्वात मोठी समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे. यापूर्वी २०१२ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजने १०,४०० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया राबविली होती. टीसीएसमध्ये प्रमुख प्रवर्तक टाटा सन्सचा सर्वाधिक ७३.३३ टक्के हिस्सा आहे.

अमेरिकेतील बदलत्या माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे एकूणच येथील उद्योगावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असतानाच टीसीएसने भागधारकांकडून चढय़ा दराने समभाग खरेदी करण्याचा निर्णय घेऊन भांडवली बाजारात सोमवारी अस्वस्थता निर्माण केली.

भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला मिळणाऱ्या १५५ अब्ज डॉलर महसुलापैकी ६५ टक्के हिस्सा हा पाश्चिमात्य देशाचा आहे. स्वत: टीसीएसही घसरत्या महसुलाचा फटका सहन करत आहे. मुंबई शेअर बाजारातील एकूण बाजारभांडवलापैकी १० टक्के हिस्सा राखणाऱ्या व सेन्सेक्समध्ये अधिकवेळा अग्रक्रम राखणाऱ्या टीसीएसने प्रस्तावित केलेला समभाग पुनर्खरेदी दर हा सोमवारी बंद झालेल्या समभाग मूल्यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी कार्यभार घेण्यापूर्वी सोमवारी टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शेवटच्या बैठकीला हजर राहताना चंद्रशेखरन यांनी समभाग पुनर्खरेदीचा निर्णय गुंतवणूकदारांकडून मागविलेल्या मार्गदर्शनाच्या आधारावर घेतल्याचे सांगितले जाते.

चंद्रशेखरन यांची नियुक्ती मंगळवारपासून टीसीएसचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील. टाटा – मिस्त्री वादानंतर सध्या या पदाचा तात्पूरता कार्यभार इशात हुसैन हे पाहत होते. व्ही. रामकृष्णन हे मुख्य वित्तीय अधिकारी तर एन. गणपती सुब्रमण्यम हे कार्यकारी अधिकारी असे टीसीएसमधील बदलही सोमवारपासूनच अस्तित्तात आले.

टीसीएसची टक्के झेप

एकूणच माहिती तंत्रज्ञान निर्देशांकात तेजीबळ आणणाऱ्या टीसीएसचा समभाग सोमवारी ४ टक्क्य़ांपर्यंत झेपावला. सेन्सेक्समध्येही हा समभाग दिवसअखेर तेजी क्रमवारीत अव्वल राहिला. मुंबई शेअर बाजारात टीसीएस सोमवारी ४.०८ टक्क्य़ांसह वाढून २,५०६.५० पर्यंत गेला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य १९,३७९ कोटी रुपयांनी भक्कम होत ते ४,९३,८८७.७६ कोटींवर गेले. कंपनीच्या समभागांचे मुंबईच्या बाजारात १.९८ लाख तर राष्ट्रीय शेअर बाजार मंचावर १९ लाखांचे व्यवहार झाले. सत्रात समभाग ६ टक्क्य़ांवर झेपावला होता.

आयटी निर्देशांक : १०,३९७.२३ +१.६२%

टीसीएस                  रु. २,५०६.५०           +४.०८%

इन्फोसिस               रु. १,०११.७०           +१.२०%

विप्रो                        रु. ४७७.९५               +०.४७%

समभाग पुर्नखरेदीचा टीसीएसने घेतलेला निर्णय एकूणच भांडवली बाजारासाठी तेजी आणणारा आहे. गेल्या काही सत्रांपासून स्थिर असलेल्या कंपनीच्या समभागाच प्रवास आता यामुळे पुन्हा एकदा तेजीत होईल. या समभागाच्या प्रवासाबद्दल आम्ही आशावादी आहोत.

सरबजित गौर नांगरा, उपाध्यक्ष (संशोधनमाहिती तंत्रज्ञान), एंजल ब्रोकिंग.