रघुराम राजन यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून रेपो दरात तीन वेळा वाढ केल्याबद्दल विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी प्रकट केली असली तरी राजन यांची धोरणे योग्यच असल्याचा निर्वाळा नोबेलने सन्मानित अर्थतज्ज्ञ प्रा. फिन किडलॅन्ड यांनी येथे बोलताना दिला.
इंडियन र्मचट्स चेंबर व मुंबई विद्यापीठाच्या प्रवीणचंद्र गांधी बँकिंग व वित्तीय व्यवस्थापन अध्यासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वार्षकि व्याख्यानात ‘इकॉनॉमिक पॉलिसी अ‍ॅण्ड ग्रोथ ऑफ नेशन्स’ या विषयावर प्रा. फिन किडलॅन्ड बोलत होते.
चढय़ा व्याजदरामुळे देशाची औद्योगिक वाढ संथ झाल्याचा औद्योगिक संघटनांचा आक्षेप फेटाळून लावतानाच महागाईच्या दरापेक्षा व्याजाचे दर अधिकच हवेत, असे त्यांनी ठासून सांगितले. सध्या रेपो दराची असलेली आठ टक्क्यांची पातळी मागील एका वर्षांच्या महागाईचा दर पाहता योग्य आहे. सध्याची अर्थव्यवस्थेची सुधारलेली स्थिती पाहता राजन यांच्याकडून कर्तव्यकठोर वर्तनाची अपेक्षा नसल्याचे त्यांनी सांगितले. कमी झालेले कच्च्या तेलाचे दर, घटलेले सोन्यासहीत अन्य आयातीत जिनसांचे भाव पाहता विदेशी व्यापारातील तूटही कमी झाली आहे. कमी झालेले कच्च्या तेलाच्या भावामुळे लवकरच किरकोळ किमतींवर महागाईचा दर आठ टक्क्यांच्या खाली येईल, जे जानेवारी २०१५ पर्यंतचे रिझव्‍‌र्ह बँकेचे महागाईच्या दराबाबतचे लक्ष्य आहे, असे किडलॅन्ड म्हणाले.
देशाची अर्थव्यवस्था रुळावर राहाण्याच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादनही त्यांनी या व्याख्यानादरम्यान केले. अमेरिकेत ही तेथील मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचे प्रयत्न झाले. कुठल्याही देशातील राज्यकर्त्यांना त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेची धोरणे अडचणी निर्माण करणारी असल्याने आवडत नाहीतच. साहजिकच अशा वेळी ते त्या देशांच्या मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्ततेला आव्हान देतात. आज जागतिक बँकेच्या क्रमवारीत उद्योग सुरू करण्यास अनुकूल देशांच्या यादीत भारताचा १४२ वा क्रमांक लागतो. जागतिक व्यापार उद्योगात भारताचा वाटा वाढवायचा असेल तर या क्रमवारीत तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता नियंत्रित करण्याआधी उद्योग सुरू करण्यास पोषक धोरणे राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.     
प्रा. फिन किडलॅन्ड हे अमेरिकेतील कॅलिफोíनया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून २००४ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषक एडवर्ड प्रेस्कॉट या अर्थतज्ज्ञासोबत त्यांना विभागून देण्यात आले. आíथक धोरणे व आíथक आवर्तनांवर परिणाम करणारे घटक या संशोधनासाठी त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला.