तुर्कस्तानच्या उद्योजकांना आवतण
रास्त कर पद्धती आणि व्यवसायपूरक वातावरणाबाबत सरकारच्या वतीने आश्वासन देतानाच भारतातील स्मार्ट सिटी, तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया तसेच अपारंपरिक ऊर्जा आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन भारताच्या अर्थमंत्र्यांनी तुर्कीतील उद्योजकांना शुक्रवारी केले.
जी२० च्या बैठक दौऱ्यासाठी तुर्कस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्या दिवशी तुर्कीतील भारतातील गुंतवणूक वाढविण्यासाठी उपस्थित उद्योजकांना प्रोत्साहित केले. दोन दिवसांच्या या बैठकीदरम्यान अर्थमंत्र्यांबरोबर रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हेही आहेत.
भारतात व्यवसायपूरक वातावरण निर्मितीसाठी केंद्र सरकारने लक्षणीय प्रगती केल्याचे ते म्हणाले. सरकारच्या रास्त कर पद्धतीबाबत प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष करांचा उल्लेख करत जेटली यांनी तुर्कीसह समस्त जगभरातील विदेशी गुंतवणूकदारांकरिता भारताने गुंतवणूक संधीसाठी अनेक प्रोत्साहनपर उपाययोजना केल्याचे नमूद केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत असलेल्या खनिज तेलाच्या दरांमुळे महागाई कमी होऊन पायाभूत सेवा क्षेत्रात अधिक निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा पायाभूत सेवा क्षेत्रासाठी विदेशी गुंतवणुकीला वाव असून तुर्कीतील उद्योजकांनी ती संधी मानावी, असेही ते म्हणाले.

अस्थिरतेबाबत चिंता नको : राजन
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीमुळे भारतासह जागतिक बाजारात उद्भवलेल्या अस्थिरतेबाबत चिंताजनक स्थिती नसून, कमी गुंतवणूक हीच खरी समस्या असल्याचे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी शुक्रवारी जी२० बैठकीदरम्यान व्यक्त केले. केवळ वित्त हेच विकासाचे वंगण असून ते विविध देशांच्या आर्थिक धोरणाची बाब ठरेल, असेही ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्था सध्या करत असलेल्या सामन्या संदर्भात ‘लोक बचत अधिक व खर्च कमी करत आहेत; त्यातच कमी उत्पादन आणि कमी गुंतवणूक अशी स्थिती निर्माण झाली आहे’, असे नमूद केले.