केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेप्रमाणे स्वस्थ भारत मोहिमेलाही उद्योगक्षेत्र तसेच जनसामान्यांकडून पाठबळ मिळण्याची आशा फिटनेस उद्योगाकडून केली जात असून, कंपन्यांना सामाजिक दायित्वापोटी सक्तीने खर्च कराव्या लागणाऱ्या निधीचा काही हिस्सा हा लोकांना स्वस्थ आणि तंदुरुस्त जीवन प्रदान करणाऱ्या उपक्रमांनाही मिळावा, अशी अपेक्षा केली जात आहे. महागडय़ा जिमच्या मासिक शुल्काच्या तुलनेत फारशा खर्चीक नसलेल्या आणि घराबाहेर इमारतीच्या आवारात, छोटय़ा जागेत सामावता येईल अशा कूची प्ले सिस्टीम्स ‘कूफिट’ या कसरत उपकरणांच्या अनावरणप्रसंगी आयोजित वास्तुरचनाकार, वास्तू सल्लागार, बिल्डर यांच्या चर्चासत्रात असा सूर व्यक्त करण्यात आला.
संपूर्ण जगभरात विशेषत: युरोप-अमेरिकेत लठ्ठपणा हा आजच्या घडीला सर्वात मोठा आजार बनून पुढे आला आहे. त्याचा सामना करताना नेदरलॅण्ड सरकारने तेथील एका शहरात कूफिट कसरत सामग्रीने युक्त ५० उद्याने विकसित करण्याचा उपक्रम राबविला. भारतानेही अनुकरण करावे असा हा पायंडा असून, तसे केंद्र सरकारला आर्जव करणारा प्रस्तावही दाखल करण्यात आहे. तथापि कंपन्यांनी सामाजिक उपक्रमांसाठी बंधनकारकरीत्या खर्च करावयाचा निधी अशा कामासाठी वापरात आणावा, असे आवाहन कूची प्ले सिस्टीम्सचे अध्यक्ष रोबेन दास यांनी केले. खुल्या मैदानात फिटनेस सामग्रीची प्रदाता असलेली कूची ही देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके व प्रमाणन प्राप्त असलेली कंपनी असून, तिच्या नव्या कूफिट श्रेणीत चेस्ट प्रेस, लॅट पुल डाऊन, पॅरलल बार्स आणि एक्सर-सायकल या अशा कसरत सामग्रीचा समावेश आहे. आज मुंबईतील अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या निवासी प्रकल्पांमध्ये उद्याने व खेळांच्या सामग्रीबरोबरच कसरतीवर विशेष ध्यान दिले जाते आणि बहुताशांनी कूची प्ले सिस्टीम्सच्या सुरक्षित उत्पादनांनाच प्राधान्य दिले असल्याचे वास्तुरचनाकार विवेक भोळे यांनी सांगितले.