फ्लिपकार्टचा मालकी हक्क असलेल्या मिंत्रा कंपनीने ऑनलाइन फॅशन संकेतस्थळ जबाँगचे अधिग्रहण केले असून यासाठी किती रक्कम खर्ची घातली जाईल याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. २०१४ मध्ये फ्लिपकार्टने जवळजवळ २००० कोटी रुपयांत मिंत्राची खरेदी केली होती. जबाँगच्या अधिग्रहणाने भारतातील फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रात फ्लिपकार्ट ग्रुप निर्विवादपणे अग्रणी राहाणार आहे. भारतातील फॅशन मल्टिब्रॅण्डपैकी जबाँग एक आहे. यात १५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड, स्पोर्ट्स लेबल, भारतीय एथनिक आणि डिझायनर लेबलचा समावेश असून, दीड लाखांहून अधिक स्टाइल्स असल्याचे मिंत्राने आपल्या निवेदनात म्हटले आहे. जबाँगकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मिंत्रा आणि जबाँगचे मिळून जवळजवळ दीड कोटी युजर्स आहेत. दोघांकडे डोरोथी पर्किंस, टॉपशॉप, टॉम टेलर, जी रॉ स्‍टार, बुगाटी शूज, द नॉर्थ फेस, फॉरेवर २१, स्‍वारोव्‍स्‍की, टिंबरलँड आणि लेकोस्‍टेसारखे ब्रॅण्ड आहेत. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि एक्झुक्युटिव्ह चेअरमन सचिन बंसल यांनी टि्वटरच्या माध्यामातून जबाँगचे आपल्या परिवारात स्वागत केले. फ्लिपकार्ट परिवारात जबाँगचे स्वागत आहे. आपण एकत्रपणे इतिहास रचू या, असा संदेश त्यांनी टि्वटरवर पोस्ट केला आहे. २०१२ मध्ये सुरू झालेली जबाँग गेल्या काही काळापासून खरेदीदाराच्या शोधात होती. काही काळासाठी तिने मिंत्रासमोर कडवे आव्हानदेखील उभे केले होते. २०१४ मध्ये नुकसान सोसावे लागलेल्या जबाँगच्या खरेदीसाठी स्नॅपडील आणि आदित्य बिर्ला ग्रुपदेखील उत्सुक होते.