ऐषारामी वस्तू व सेवांच्या कर मात्रेवर आज निर्णय

अन्नधान्य, दूध यासह साबण, टूथपेस्ट आदी नित्याच्या वस्तू येत्या जुलैपासून वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीने स्वस्त होणार आहेत. या प्रस्तावित कर रचनेचा जनसामान्यांना फारसा तडाखा बसणार नाही अशी काळजी घेत गुरुवारी जीएसटी परिषदेने हजाराच्या घरात वस्तूंसाठी दर मात्रा निश्चित केली.

तंबाखूजन्य पदार्थ तसेच मौल्यवान धातू आदींसाठी करांचा दर शुक्रवारी निश्चित होणार आहे. अनेक मुख्य वस्तू या कमी दराच्या टप्प्यात आल्याने जीएसटीमुळे भविष्यात महागाईच्या शक्यतेबाबत दिलासा मिळाला आहे.

विविध वस्तूंवरील कर दर निश्चितीकरता वस्तू व सेवा कर परिषदेची दोन दिवसांची बैठक गुरुवारपासून श्रीनगर येथे सुरू झाली. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला महसूल सचिव हसमुख अधिया विविध २९ राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांतील सरकारच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे.

अन्नधान्य, दूधाचे दर शून्य टक्के कर रचनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. तर कोळसा, साखर, चहा, कॉफी, खाद्यतेल, मिठाई हे ५ टक्के अशा किमान अशा कर दर टप्प्यात ठेवण्यात आले आहेत. या वस्तूंवर यापूर्वी ४ ते ६ टक्के कर लागत असे. टूथपेस्ट, केश तेल, साबण या वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के कर लागू होईल.

सर्वाधिक ४३ टक्के वस्तू या १८ टक्के कर टप्प्यात आहेत. तर एकूण वस्तूंपैकी १७ व १९ टक्के वस्तू या अनुक्रमे १२ व २८ टक्के कर स्तरामध्ये समाविष्ट आहेत. अन्नधान्याशी संबंधित वस्तूंचे प्रमाण १४ टक्के असून ते किमान अशा ५ टक्के कर टप्प्यात ठेवण्यात आले आहे.

जीवनावश्यक व दैनंदिन वापराच्या वस्तू या किमान कर दर टप्प्यात ठेवण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. विविध गटातील वस्तूंसाठी ५, १२, १८ व २८ टक्के असे कर टप्पे आहेत. कर सुधारणेसाठी सात नवे नियम तयार करण्यात आले असून पहिल्या दिवशी एकूण १,२११ वस्तूंपैकी १,१५० वस्तूंची कर मात्रा निश्चित करण्यात आली आहे.

परिषदेच्या पहिल्या दिवशीच्या बैठकीत ८० ते ९० टक्के वस्तूंचा दर स्तर निश्चित झाला असल्याची माहिती देण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थ, मौल्यवान धातू, पादत्राणे, वस्त्र, जैवइंधन गटातील वस्तूंचे दर शुक्रवारच्या बैठकीत ठरतील, असेही स्पष्ट करण्यात आले. राज्यांकडून आलेल्या सूचनेनंतर अंतिम वस्तू कर दर सूची जाहीर केली जाईल.

untitled-14