भारतीय रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारी या आíथक वर्षांतील आपले पाचवे पतधोरण जाहीर करीत आहे. किरकोळ व घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक हा गेल्या पाच वर्षांच्या नीचांकी टप्प्यावर आल्याने अर्थजगताशी संबंधितांना व्याज दरकपातीची आस कायम आहे; परंतु रिझव्‍‌र्ह बँकेच्या आधीच्या पतधोरण परिपत्रकांचा अभ्यास केला तर गव्‍‌र्हनर डॉ. रघुराम राजन हे महागाईचा कणा मोडण्याची भाषा करीत आहेत, असे दिसते. विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी वाढत्या महागाईचा कायम बंदोबस्त करणे जरुरीचे असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे मत आहे. हे खरेही आहे. अर्थव्यवस्था भांडवलदारस्नेही अथवा साम्यवादी असली तरी कुठल्याही अर्थव्यवस्थेत एका मर्यादेपलीकडे महागाई असणे मान्य होत नाही. म्हणूनच डॉ. राजन अक्षय विकासासाठी महागाईचा नायनाट करण्याची भाषा करीत आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेने नेमलेल्या डॉ. ऊर्जति पटेल समितीने भविष्यात पतधोरणविषयक निर्णय घेण्यासाठी किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांक प्रमाण मानावा, अशी सूचना केली आहे. हा अहवाल रिझव्‍‌र्ह बँकेने स्वीकारल्यामुळे यापुढील व्याजदरविषयक निर्णय हे किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांकावर आधारित असणार आहेत. आमच्या मते, भविष्यात चार ते सहा महिने किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांकाची वाढ ७ टक्क्यांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. महागाई कमी होण्याची कारणे जाणून घेतल्यास प्रामुख्याने इंधन व अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई आटोक्यात आली आहे. या गोष्टींवर ना सरकारचे नियंत्रण, ना रिझव्‍‌र्ह बँकेचे असते. जशा किमती कमी झाल्या तशा त्या वाढूही शकतात. ‘ओपेक’ने तेल उत्पादन कपात करण्यास नकार दिला म्हणून कच्च्या तेलाच्या किमती आणखी खाली येतील या सिद्धांतावर रिझव्‍‌र्ह बँक विश्वास ठेवून रेपो दरात कपात करू शकत नाही. तसेच अमेरिकेकडून व्याज दरवाढ होणे व त्याच सुमारास रेपो दरात कपात केल्यास डॉलरबरोबरच्या रुपयाच्या विनिमय दरांमध्ये नकारात्मक परिणाम होऊन रुपयाचे वेगाने अवमूल्यन होण्याचा धोका रिझव्‍‌र्ह बँक दृष्टिआड करू शकत नाही. म्हणून मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणात रेपो दरकपातीची शक्यता वाटत नाही. परंतु नवीन वर्षांत टप्प्याटप्प्याने एक टक्क्याची शक्यता संभवते. या दरकपातीचा फायदा वाहननिर्मिती, स्थावर मालमत्ता, बँक, पायाभूत सुविधा क्षेत्र यांसारख्या व्याजदर संवेदनशील उद्योगांना होईल.
(लेखक कार्वी सिक्युरिटीज पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेसशी संबंधित आहेत.)