येत्या महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणाऱ्या यू. के. सिन्हा यांच्याकडील सेबी अध्यक्षपदाकरिता सरकारकडे अंतिम सात उमेदवारांची नावे आल्याचे कळते. यामध्ये स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, आयडीएफसी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये, वायदा बाजार आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश अभिषेक यांची नावे अग्रणी आहेत.

सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांची मुदत १७ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. नव्या अध्यक्षपदाकरिता केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने भट्टाचार्य, लिमये, अभिषेक यांच्यासह एम. एस. साहू (भारतीय स्पर्धा आयोगाचे सदस्य) व सेबीचेच सध्याचे पूर्णवेळ सदस्य राजीव कुमार अगरवाल व राष्ट्रपतींच्या कार्यालयातील अतिरिक्त सचिव थॉमस मॅथ्यू यांच्याही नावावर विचार करणे सुरू केले आहे. पैकी भट्टाचार्य यांना येत्या आठवडय़ात होणाऱ्या मुलाखतीसाठीही बोलाविण्यात आल्याचे समजते.

बंगळुरू येथे गुरुवारी स्टेट बँकेच्या एका कार्यक्रमादरम्यान, भट्टाचार्य यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आपण सध्याच्या आपल्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करत असून आपल्या नावाची चर्चा हा केवळ अंदाज असल्याचे त्या म्हणाल्या. सार्वजनिक क्षेत्रासह खासगी क्षेत्रातूनही तब्बल ७० अर्ज सेबी अध्यक्षपदासाठी आल्याचे कळते.