देशात २०१६ मध्ये थेट विदेशी गुंतवणूक १८ टक्क्यांनी वाढून ४६ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. आधीच्या वर्षांत ती ३९.३२ अब्ज डॉलर होती.

भारतातील सेवा, दूरसंचार, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्राला विदेशी गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याने यंदा थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे. सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, जपान आदी देशांतून यंदा विदेशी निधीचा ओघ आला आहे.

२०१६ मध्ये ऑक्टोबर महिन्यात थेट विदेशी गुंतवणूक सर्वाधिक, तर मेमध्ये ती वर्षांतील किमान राहिली आहे.

गेल्या वर्षांतील वाढीचे आकडे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन मंडळाने शुक्रवारी जाहीर केली. थेट विदेशी गुंतवणुकीबाबतचे काही नियम केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये शिथिल केले आहेत. देशातील पायाभूत सेवा क्षेत्रात एक लाख कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

‘इफेक्स’ची ३०० टक्के वाढीची कामगिरी

मुंबई : मुंबईस्थित व्यवस्थापन सल्ला कंपनी ‘इफेक्स बिझनेस सोल्यूशन्स’ने २०१६ या वर्षांत महत्त्वपूर्ण कामगिरींची नोंद करताना, महसुलात तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीचे मुख्यालय वसई येथून दक्षिण मुंबईत हलविले गेले आहे, तर २०१७ मध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे मुंबईत कंपनीने प्रॉपेल एक्सलन्स प्रोग्राम (पीईपी) दाखल केला आहे, अशी माहिती ‘इफेक्स बिझनेस सोल्यूशन्स’चे मुख्य सल्लागार आणि सहसंस्थापक हार्दिक हर्सारा यांनी दिली. प्रॉपेल ही अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे, ज्यात वृद्धी योजना, समस्या निवारण आणि कामगिरी व्यवस्थापन अशा तीन महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. प्रॉपेल एक्सलन्स प्रोग्राम हा संपूर्णत: लघू आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) समर्पित आहे.