बाजारातील निवडणूक-पूर्व तेजीने विलक्षण रूप धारण केले आहे. चालू आठवडय़ात मंगळवारची काही दशांशाची मामुली घसरण वगळता, सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांकांची नव्या अभूतपूर्व शिखरांच्या दिशेने वाटचाल हेच दर्शविते. काहींच्या मते ही निवडणुकानंतर नव्याने येऊ पाहणाऱ्या सरकारबाबत ‘आशा-अपेक्षा’ हिंदोळ्यावर स्वार झालेला तेजीचा बहर आहे. पण या तेजीचा चालक खरे तर विदेशातील पैसा आहे. ‘सेबी’द्वारे उपलब्ध माहितीनुरूप ‘पार्टिसिपेटरी नोट्स’ (पी-नोट्स)द्वारे देशातील गुंतवणुकीत निरंतर वाढ होत आहे. म्हणजे नोंदणीकृत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून बाजारात दैनंदिन खोऱ्याने खरेदी सुरूच आहे, परंतु अशी स्वत:कडे नोंदणी नसलेल्या गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी ‘सेबी’ने उपलब्ध करून दिलेल्या साधनाचा म्हणजे पी-नोट्सचा वापर करणारे विदेशी गुंतवणूकदारांचे मोठय़ा संख्येने भारताबद्दलचे स्वारस्य वाढले आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये या माध्यमातून १,७२,७३८ कोटी रुपयांची गुंतवणूक समभाग, रोखे (डेट पर्याय) आणि डेरिव्हेटिव्हज्मध्ये झाल्याचे सेबीचा अहवाल सांगतो. आधीच्या जानेवारीमध्ये हा आकडा १,६३,३४८ कोटींचा म्हणजे डिसेंबर २०१३ मधील स्तरापेक्षा अधिक होता. निर्देशांकांची ऐतिहासिक उंची, विदेशी चलन गंगाजळीला सुकाळ आणि रुपयाच्या मूल्यातील गेल्या काही दिवसांतील लक्षणीय सुधाराचे परिणाम यातून दिसतच आहेत. पण गमतीची गोष्ट म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच एप्रिल २०१२ च्या सुमारास आजच्या नेमके उलट म्हणजे याच पी-नोट्स गुंतवणुकांमुळे बाजाराचा थरकाप उडावा अशी स्थिती निर्माण झाली होती. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची पी-नोट्सवरील ‘कर-गार’ वक्रदृष्टी शेअर बाजारात घबराटीचे कारण बनल्या होत्या, पण झाले गेले गंगेला मिळाले. आता याच फिरंगी गुंतवणुकीच्या पालटरूपाचा आविष्कार आपण अनुभवत आहोत.    
तथापि, सरलेल्या आठवडय़ाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बाजारातील तेजीला आता खऱ्या अर्थाने सर्वव्यापी व र्सवकष रूप मिळू लागले आहे. सपाटीला गेलेला बँकिंग निर्देशांकाने दमदार उचल घेतली आहे; वाहन क्षेत्रही तेजीच्या प्रवाहात सामील झाले आहे; स्थावर मालमत्ता, बांधकाम क्षेत्रातील निवडक समभाग दिवसागणिक चमक दाखवीत आहेत. एकुणात आयटी आणि फार्मा समभागांवरील केंद्रीकरण बऱ्यापैकी ओसरले आहे.
यापूर्वी स्तंभात म्हटल्याप्रमाणे अनेक मिड-कॅप, स्मॉल-कॅप समभागांनी बहुवार्षिक गर्तेतून बाहेर येत नवीन सार्वकालिक उच्चांकांना गवसणी घातली आहे. तरी आजही बरेच गुणात्मक व मूल्यात्मक वकुब असलेले मिड-कॅप समभाग हे त्यांच्या २००८ सालच्या पातळीपेक्षा ३० ते ४०% खाली आहेत. असे समभाग हेरून त्यांच्या खरेदीची हीच संधी आहे, हे सुज्ञांनी जाणावे.
बहुतांश तांत्रिक-विश्लेषकांनी सध्या सुरू असलेली ही तेजी सलग दोन-तीन वर्षे तरी कायम राहण्याचे भाकिते वर्तविली आहेत. गेली पाच वर्षे अस्थिरतेत गुजरलेल्या आपल्या बाजारात हे अपेक्षितच होते. बाजाराचा कल कधीही एकाच दिशेने दीर्घकाळ सुरू राहत नसतो. त्यामुळे विद्यमान तेजीतही निर्देशांकात पाच-दहा टक्क्य़ांनी सुधार दर्शविणारी प्रत्येक घसरण ही खरेदीची संधी मानली जावी. मेच्या मध्यावरील निकालानंतरही निर्देशांक डिसेंबपर्यंत आणखी १०-१२ टक्क्य़ांची वाढ निश्चितच दाखवेल, याबद्दलही अनेकांचे एकमत आहे.
शिफारस: वर म्हटल्याप्रमाणे गुणात्मक आणि मूल्यात्मक अशा दमदार शक्यता असलेल्या मिड-कॅप समभागांपैकी व्हर्लपुल ऑफ इंडियाकडे खरेदीच्या दृष्टीने पाहता येईल.