प्राप्तिकर विवरण पत्रासाठी सुधारित करण्यात आलेल्या अर्जामध्ये विदेश प्रवासाची नोंद करणे बंधनकारक ठरणार नाही, अशी पावले सरकार उचलत आहे. कंपन्यांनी प्रोयोजित केलेल्या परदेश प्रवासाची नोंद नव्या प्राप्तिकर विवरण पत्रात करण्याची गरज नाही, अशी तयारीच सुरू आहे.
प्राप्तिकर विवरण पत्रासाठीचा नवा अर्ज सरकार तयार करत आहे. यात विदेश प्रवास तसेच विदेशातील मालमत्ता यांचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
यावरून उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. या अर्जाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यानी घेतलेल्या बैठकीतही उद्योजकांनी ही बाब अधोरेखित केली होती.
यानुसार आता कंपन्यांनी प्रायोजित केलेला विदेश प्रवास नव्या अर्जात नमूद करण्याची गरज नाही, अशी व्यवस्था सरकार करत असल्याचे समजते. नव्या अर्जात एखाद्या मर्यादेपल्याड विदेश प्रवासाची रक्कम नमूद करावी लागण्याची शक्यताही आहे.
मात्र विदेशातील स्थावर तसेच अन्य मालमत्ता, संपत्ती यांची माहिती नमूद करणे तसेच विदेशातील बँक खात्यांची सविस्तर माहिती देणेही अनिवार्य करण्याच्या मतावर सरकार ठाम असल्याचे संकेत सरकारमधील अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
काळा पैसा रोखण्यासाठी नव्या प्राप्तिकर विवरण पत्रातील सुधारित अर्जात बदल करण्यात येत असून काही नोंदीबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर सरकारने त्यात सुधारणा करण्याचे निश्चित केले असून याबाबतचे चित्र चालू महिनाअखेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पगारदार व्यक्तींना आयटीआर१ किंवा आयटीआर२ हे येत्या ३१ जुलैपर्यंत भरणे बंधनकारक आहे. सरकारने गेल्याच आठवडय़ात संसदेत काळा पैशाबाबतचे विधेयक पारित केले आहे.
नव्या  प्राप्तिकर विवरण पत्रासाठीच्या अर्जासाठी खुद्द केंद्रीय अर्थमंत्री आग्रही होते. याबाबतच्या मुद्दय़ांचाही त्यात विचार करण्यात आला होता. मात्र ते प्रत्यक्षात अंतर्भूत करण्यापूर्वीच तमाम उद्योगसह अनेकांनी त्याबाबत सरकारकडे आक्षेप नोंदविला.