केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध आता उठवले जाणार आहेत. येत्या १३ मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. रिझर्व्ह बँकेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली.  बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. सध्या बँक खात्यामधून दिवसाला २४ हजार इतकी रक्कम काढता येऊ शकते. मात्र, येत्या २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा काहीप्रमाणात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून त्यांच्या बँक खात्यांमधून ५०,००० रूपये काढता येतील. २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात ही मर्यादा कायम राहिल. त्यानंतर १३ मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून ग्राहकांना दिवसाकाठी पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे.

दरम्यान, २७ जानेवारीपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण ९.९२ लाख कोटी रूपये मुल्याच्या ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आल्याची माहितीही यावेळी रिझर्व्ह बँकेतर्फे देण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात अभूतपूर्व चलनटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस सामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. चलनटंचाईमुळे बँक आणि एटीएम केंद्रातून रक्कम काढण्यावरही रिझर्व्ह बँकेकडून अनेक निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या काही काळात हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात आले होते. मात्र, तरीही काही निर्बंध अजूनही कायम होते.

केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी काही दिवसांपूर्वी बँकेतील बचत खात्यातील रक्कम काढण्यावरील मर्यादा लवकरच हटवण्यात येणार असल्याबद्दल सुतोवाच केले होते. सध्याच्या नियमानुसार, बँकेच्या बचत खात्यातून आठवड्याला फक्त २४ हजार रुपये काढता येणार आहेत. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला २००० आणि त्यानंतर ४००० रुपये दिवसाला काढता येतील, असा नियम जाहीर केला होता. तसेच एका आठवड्यात बँकेतून २४ हजार रुपये काढता येतील, असाही नियम लागू केला होता. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यावरील मर्यादेत वाढ करून दिवसाला १० हजार रुपये काढण्याची सूट दिली होती. मात्र, आठवड्याला फक्त २४ हजार रुपयेच काढता येतील, हा नियम कायम ठेवला होता.

मागील महिन्यात रिझर्व्ह बँकेने १ फेब्रुवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा हटवली होती. त्यानुसार बचत खाते असलेले ग्राहक एटीएममधून एकावेळी २४ हजार रुपयेही काढू शकतात, असा नियम लागू केला होता. पण एटीएममधून आठवड्याला २४ हजार रुपयेच काढता येतील, हा नियम कायम ठेवला होता. दरम्यान, चलनातून रद्द करण्यात आलेल्या जुन्या नोटांच्या मूल्याइतक्याच नव्या नोटा चलनात आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहितीही शक्तिकांता दास यांनी यावेळी दिली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना नोटाबंदीमुळे होणारा त्रास लवकरच संपेल, असे सांगितले होते.