केंद्रातील सरकारने सिंचन व ग्रामीण पेयजल पुरवठा वाढविण्याकरिता जाहीर केलेले विविध उपक्रम तसेच ग्रामीण गृहनिर्माण विस्ताराकरिता अर्थसंकल्पात केलेली भरीव तरतूद याचा सर्वाधिक लाभ मिळण्याचा विश्वास फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने व्यक्त केला आहे.
पीव्हीसी पाइप्स व फिटिंग्समधील या अग्रणी फिनोलेक्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ धानोरकर यांनी येत्या काळात कृषी क्षेत्राबरोबरच बांधकाम उद्योगाकडूनही मागणी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. म्हणूनच कंपनीने पूर्व आणि पूवरेत्तर भारतामध्ये तिच्या उत्पादनांच्या वाढत असलेल्या मागणीच्या पूर्ततेसाठी उडिशा राज्यातील कटक येथे मोठय़ा क्षमतेच्या गोदामाची उभारणी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीने ३० जून २०१४ अखेर तिमाहीत ६६३ कोटींच्या उलाढालीवर ५०.२ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत उलाढाल ५६३.४९ कोटींची, तर निव्वळ नफा २२.६ कोटींचा होता. चालू वर्षांतील उर्वरित तिमाहींमध्ये केंद्राच्या सिंचन व पेयजल पुरवठय़ात वाढीवर भर देणाऱ्या कार्यक्रमाचे कंपनीच्या ताळेबंदावर सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला.