अद्ययावततेला मर्यादा, हार्डवेअरमधील नावीन्यतेचा अभाव हे नव्या वर्षांत टॅबलेट वाढीच्या मुळावर घाव घालणारे ठरणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. गॅझेटचे वाढते आयुर्मान आणि एकाच उपकरणाचा सर्व कुटुंबांमध्ये उपयोग यामुळे २०१५ मध्ये टॅबलेटची वाढ अवघी ८ टक्क्यांची राहण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपकरणांचा अभ्यास करणाऱ्या ‘गार्टनर’ने एकूण क्षेत्राच्या २०१५ मधील प्रगतीबाबत आकडेवारी देताना म्हटले आहे की, चालू वर्षांत टॅबलेटची मागणी कमी राहण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या दोन्ही वर्षांत दुहेरी आकडय़ांत वाढलेली टॅबलेटची विक्री यंदा केवळ ८ टक्क्यानेच उंचावेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. २०१५ मध्ये जागतिक स्तरावर २३.३० कोटी टॅबलेटची विक्री होण्याचा अंदाज गार्टनरने व्यक्त केला आहे. २०१४ मध्येही ही बाजारपेठ चिंताजनक स्थितीत होती, असे गार्टनरचे संशोधक संचालक रणजित अटवाल यांनी म्हटले आहे. तर वैयक्तिक संगणक (पीसी), मोबाइल फोन आदी सर्व उपकरणाची विक्री २.५ अब्जापर्यंत पोहोचणार असून त्यातील वार्षिक वाढ ही ३.९ टक्के असेल, असेही त्यांनी नमूद केले.
मोबाइल क्षेत्र ३.७ टक्क्यांनी वाढून २०१६ पर्यंत त्यांची संख्या दोन अब्ज होईल, असे गार्टनरने अंदाजित केले आहे. त्यातही स्मार्टफोन व ६,५०० रुपयांवरील फोन आघाडीवर असतील, असे म्हटले आहे. २०१४ मध्ये अ‍ॅण्ड्रॉइडवरील फोनची विक्री एक अब्जपेक्षा अधिक झाली आहे. ती वर्षभरात २६ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१५ मध्ये आयओएसपेक्षा विण्डोजप्रणाली विक्रीबाबत अधिक वेग घेईल, असेही नमूद करण्यात आले आहे.