सप्ताहारंभी शेअर निर्देशांकांच्या उडालेल्या घसरगुंडीने भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत शंका घेण्याचे काहीही कारण नसल्याचे स्पष्ट करून, आगामी आठवडय़ात जाहीर होणारे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आणि ग्राहक किमतीवर आधारित महागाईचा दर हे दोन्ही आकडे सुखद धक्का देणारे असतील, असा विश्वास ‘एसबीआय रिसर्च’ने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या टिपणात व्यक्त केला.
स्टेट बँकेचे आर्थिक विश्लेषणात्मक अंग असलेल्या एसबीआय रिसर्चने केलेल्या विश्लेषणात १९९२ नंतर शेअरबाजाराच्या गटांगळ्यांचा आढावा घेण्यात आला असून, त्यात घसरणीमागे बाह्य़ घटकांपेक्षा देशांतर्गत आर्थिक व अन्य घटक कारणीभूत असतील, तर बाजारावर दीर्घ काळापर्यंत मरगळीची छाया राहते. त्या उलट ताजी घसरण ही मुख्यत: बाह्य़ घटकांमुळे तिला नजरेआड केलेलेच बरे, असे या अहवालाने सूचित केले आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष हे देशात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आगामी आकडेवारीकडे असायला हवे, असेही अहवाल सुचवितो.
येत्या सोमवारी, ३१ ऑगस्टला चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे अधिकृतपणे जाहीर केले जातील. त्यानंतरच्या आठवडय़ात सरलेल्या ऑगस्ट महिन्यातील किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराचे आकडेही येतील. या दोन्ही आकडय़ांबाबत गुंतवणूकदारांनी सकारात्मकता बाळगण्यास काहीच हरकत नसल्याचे हा अहवाल सांगतो.
ऑगस्टच्या मध्यापासून चालू आठवडय़ाच्या प्रारंभापर्यंत जागतिक भांडवली बाजारात पडझडीचे पडसाद म्हणून सेन्सेक्सने तब्बल २,३०० अंशांची तूट गमावली. आता पुन्हा सावरून त्याने २६ हजाराची पातळी पुन्हा कमावली आहे. सरलेल्या सोमवारी चिनी बाजारातील समभाग विक्रीच्या वणव्याने तर सेन्सेक्समध्ये १,६२५ अंशांच्या ऐतिहासिक घसरणीसह, गुंतवणूकदारांच्या ३ लाख कोटी रुपयांच्या मत्तेची राख केली होती. दुसरीकडे प्रतिडॉलर ६७ रुपयांपर्यंत अवनत होत असलेला रुपयाही सावरल्याचे दिसून आले आहे.
चिनी चलन युआनचे अवमूल्यन हे भारतासह सर्व उभरत्या अर्थव्यवस्थांच्या पथ्यावर पडणारे ठरेल, असे अहवालाचे मत आहे. युआनच्या अवमूल्यनाने जागतिक अर्थव्यवस्थेत तात्पुरता कल्लोळ माजवला असला आणि दीर्घमुदतीत चिनी निर्यातीला चालना देणारा हा प्रयत्न चीनचे आयात व्यवहार सुरू असणाऱ्या देशांसाठीही फायद्याचा ठरेल. चिनी अर्थव्यवस्था रूळावर येणे हे जगाच्या दृष्टीनेही मोलाचेच असल्याचा अहवालाचा निष्कर्ष आहे.