भारतातील वाहनविक्री पूर्ण गुंडाळण्याचा व पुण्यातून निर्यातीपुरत्याच निर्मितीचा निर्णय

अमेरिकास्थित जगातील तिसरी मोठी वाहन उत्पादक कंपनीने तिचा भारतातील व्यवसाय आवरता घेतला आहे. शेव्हर्ले नाममुद्रेंतर्गत देशातील वाहनविक्री वर्षअखेर बंद करण्याचे जाहीर करतानाच जनरल मोटर्स इंडियाने आता केवळ निर्यातीकरिताच वाहने तयार करण्याचे स्पष्ट केले आहे. डिसेंबर २०१७ पर्यंतच्या कंपनीच्या निवडक वाहनांची विक्री टप्प्याटप्प्याने संपुष्टात येईल.

नव्या व्यवसाय धोरणानुसार, जनरल मोटर्स इंडिया केवळ बिट ही हॅचबॅक श्रेणीतील वाहनच तयार करणार असून कालांतराने याच नावाचे सेदान वाहनही सादर करेल. मात्र कंपनीच्या तळेगाव येथील प्रकल्पातून तयार होणारी ही वाहने केवळ निर्यातीसाठीच असतील. मेक्सिको, मध्य व दक्षिण अमेरिकी बाजारपेठेसाठी भारतातील हा प्रकल्प निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

देशातील पाचवी मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या जनरल मोटर्सचा भारतातील व्यवसाय दोन दशकांपूर्वी १९९६ मध्ये सुरू झाला. खास भारतीय वाहन बाजारपेठेसाठी २००३ पर्यंत ओपेल ही नाममुद्रा विकसित करणाऱ्या जनरल मोटर्सने २००७ च्या सुमारास शेव्हले नाममुद्रेंतर्गत वाहन सेदार केली.

कंपनीची प्रवासी वाहन गटात स्पार्क, बिट, सेल, युवा, कॅप्टिव्हा, क्रुझ, तवेरा, एन्जॉय, ट्रेलब्लेझर आदी वाहने आहेत, तर फॉरेस्टर, ऑप्ट्रा, ओव्हीओ ही यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. हॅचबॅग, सेदान आणि एसयूव्ही गटातील निवडक पाच वाहन प्रकारासह कंपनीचा सध्याचा भारतातील वाहन क्षेत्राचा प्रवास सुरू होता.

जनरल मोटर्सने २०१५ मध्ये २०२० पर्यंत दुप्पट, ३ टक्के बाजारहिश्शाचे उद्दिष्ट जाहीर केले होते. मात्र मार्च २०१७ अखेर तो आधीच्या वर्षांतील १.१७ टक्क्यांच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षाही खाली आला. मार्चअखेर जनरल मोटर्सच्या भारतातील वाहनांची विक्री घसरून २५,८२३ वर आली. मात्र या दरम्यान कंपनीची निर्यात दुप्पट झाली.

जनरल मोटर्स इंडिया कंपनीचे देशात हलोल (गुजरात) व तळेगाव (पुणे, महाराष्ट्र) येथे वाहननिर्मिती प्रकल्प आहेत, तर बंगळूरु येथे तांत्रिक व संशोधन केंद्र आहे. पैकी हलोल येथील प्रकल्प गेल्याच महिन्यात बंद करण्यात आला असून तो कंपनीची व्यावसायिक भागीदार एसएआयसी या कंपनीला विकण्याची तयारी सुरू आहे. पुणे प्रकल्प व बंगळूरु केंद्र कायम राहणार आहे.

तवेरा अन् प्रतिष्ठेला बट्टा

जनरल मोटर्सचा भारतीय वाहन क्षेत्रात दोन दशकांपूर्वी सुरू झालेला प्रवास २०१० पर्यंत वेगात सुरू होता. सुरुवातीला ओपेल या नाममुद्रेचे यश,  नंतर शेव्हर्ले नाममुद्रेला प्रारंभ झाला असतानाच २०१३ मध्ये प्रदूषणाच्या निमित्ताने कंपनीची बहुपयोगी गटातील तवेरा चर्चेत आली. कंपनीला १.१४ लाख वाहने माघारी घ्यावी लागली. भारतातील ही सर्वात मोठी वाहनमाघार ठरली. यापोटी कंपनीला २५ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवावा लागला, तर २.३० कोटी डॉलरचा दंड भरावा लागला होता. यानंतर कंपनीने तवेरा बनविली नाही. उलट बहुपयोगी गटातील एन्जॉय हे नवे वाहन सादर केले.