आगामी काळात जागतिक स्तरावर स्मार्टफोनची वाढ मंदावेल, असा इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी)ने भाकीत वर्तविले आहे. स्मार्टफोन्सच्या मागणीत वाढीचा दर हा विद्यमान २०१५ सालात ११.३ टक्क्यांवर स्थिरावेल. सरलेल्या २०१४ सालात हा दर २७.६ टक्के होता. चीन हा गुगलच्या अँड्रॉइडसमर्थ कार्यप्रणालीवर आधारित स्मार्टफोनची महत्त्वाची बाजारपेठ असून, विद्यमान वर्षांतील पहिल्या तिमाहीत तेथून मागणीला रोडावल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
आयडीसीच्या मते चालू वर्षांत दोन महत्त्वाच्या शक्यतांवर लक्ष ठेवावे लागेल. जसे अपेक्षा केली जात आहे त्याप्रमाणे जागतिक वाढदरापेक्षा चीनमधून स्मार्टफोनच्या मागणीतील वाढीचा दर हा पहिल्यांदाच लक्षणीय म्हणजे २.५ टक्क्यांपेक्षा कमी राहील. दुसरे म्हणजे चीनने स्वत:च केलेल्या भाकितापेक्षा जागतिक बाजारपेठेच्या सरासरीच्या तुलनेत त्या देशातील वाढीचा दर हा ८.५ टक्क्यांपेक्षा कमी राहील. या दोन्ही शक्यता नकारार्थीच असून त्यातून एकूण जागतिक मागणीला लक्षणीयरीत्या प्रभावित केले जाणार आहे. जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत एकटय़ा चीनचा वाटा अलीकडच्या वर्षांत ३६ टक्के इतका आहे.