विशेषत: भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांतून वाढलेल्या मागणीमुळे जागतिक स्तरावर स्मार्टफोन्सची विक्री सरलेल्या जानेवारी ते मार्च २०१५ तिमाहीत ३३.६ कोटींवर गेली आहे. आधीच्या वर्षांतील याच तिमाहीतील विक्रीच्या तुलनेत ती तब्बल १९.३ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र मुख्यत: चीनमधून मागणीला मर्यादा येणार असल्याने आगामी काळात स्मार्टफोन्सच्या वाढीला बांध लागेल, असेही कयास वर्तविण्यात येत आहेत.
स्मार्टफोन बाजारपेठेचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ‘गार्टनर’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चीन वगळता आशिया पॅसिफिक क्षेत्र, पूर्व युरोप, आखाती देश आणि उत्तर आफ्रिका हे स्मार्टफोनच्या मागणीला मोठा हातभार लावणाऱ्या उदयोन्मुख बाजारपेठा ठरल्या आहेत. या क्षेत्रांतून सरलेल्या तिमाहीत एकूण मागणीत ४० टक्क्यांनी वाढीचे योगदान दिले आहे.
सरलेल्या तिमाहीत एकूण मोबाइल फोनच्या बाजारपेठेने (स्मार्टफोनसह सामान्य फीचर फोन) विक्रीत २.५ टक्क्यांची माफक वाढ दर्शवून ती ४६.२ कोटींवर नेली आहे, असे गार्टनरने स्पष्ट केले आहे. मोबाइल बाजारपेठेवर सॅमसंगचा वरचष्मा हा २१.३ टक्के बाजारहिश्श्यासह कायम आहे. त्या खालोखाल अ‍ॅपल (१३.१ टक्के), मायक्रोसॉफ्ट (७.२ टक्के), एलजी इलेक्ट्रॉनिक्स (४.३ टक्के) आणि लेनोव्हो (४.२ टक्के) असा बाजारहिस्सा आहे. गार्टनरचे संशोधक संचालक अंशुल गुप्ता यांनी उत्तरोत्तर स्थानिक आणि चिनी बनावटीच्या मोबाइल ब्रॅण्ड्सकडून वेगाने बाजारहिस्सा कमावला जातो याकडेही लक्ष वेधले. गतवर्षांच्या तुलनेत त्यांच्या विक्रीचा वृद्धिदर हा लक्षणीय ७३ टक्क्यांनी वाढला आहे. तर एकूण जागतिक बाजारपेठेत त्यांचा हिस्सा हा गतवर्षांतील मार्चअखेर असलेल्या ३८ टक्क्यांवरून ४७ टक्के असा वाढला आहे.
त्याउलट सॅमसंग जरी आज अग्रस्थानी असला तरी त्यांचा बाजारहिस्सा व विक्रीतही निरंतर घसरण सुरू आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. अ‍ॅपलने मात्र निरंतर सशक्त विक्री कामगिरी सुरू ठेवली असून, विशेषत: चीनमधून आयफोनच्या बहारदार मागणीमुळे सरलेल्या तिमाहीत अ‍ॅपल फोनच्या विक्रीने भरघोस ७२.५ टक्क्यांची वाढ दाखविली आहे.