गेल्या वर्षांतील अक्षय तृतियेला तोळ्याला ३० हजारी भाव गाठणाऱ्या सोन्याच्या दरात यंदाच्या मुहूर्ताला आलेली कमालीची नरमाई पाहता खरेदी वाढण्याचा आशावाद उंचावला गेला आहे.
गेल्या अक्षय तृतियेच्या मुहूर्ताला सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी तब्बल ३० हजार रुपये होता. त्यामुळे त्याला विशेष मागणी नव्हती. यानंतर सतत घसरत्या किंमतींमुळे सोन्याची आयातही मार्च २०१५ मध्ये ९३.८६ टक्क्य़ांनी वाढली.
मंगळवारच्या अक्षय तृतियेला सोन्याच्या दागिन्यांचे व्यवहार २५ ते ३० टक्क्य़ांनी अधिक होण्याचा आशावाद सराफांनी व्यक्त केला आहे. सोने दरातील नरमाई गेल्या काही महिन्यांपासून कायम असली तरी यंदाच्या गुडीपाडव्यालाही मागणीच्या दृष्टिने त्यात लक्षणीय हालचाल झाली नाही.
सराफा व्यावसासियांचे देशव्यापी व्यासपीठ असलेल्या ‘कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (सीएआयटी) म्हटले आहे की, गेल्या अक्षय तृतियेच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया यांनी नमूद केले की, अशा सणांना प्रामुख्याने छोटय़ा धातूंचे व्यवहार, खरेदी-विक्री अधिक प्रमाणात होते. ठोस प्रकारातील सोन्यालाही अशा मुहूर्ताला मागणी असते, असेही ते म्हणाले.
असेच काहीसे मत ‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) व्यक्त केले आहे. परिषदेच्या भारतीय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी म्हटले आहे की, यंदा सोन्याचे दर स्थिर असले तरी व्यवहार मात्र काहीसे उंचावण्याची चिन्हे आहेत. आयात र्निबध शिथिल केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही ते म्हणाले. किंबहुना मंगळवारच्या सोने खरेदी मुहूर्तापासून सोन्याच्या मागणीतील चकाकी पुन्हा पहायला मिळेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर कमालीने खाली आले आहेत. तेव्हा आता सोन्यातील गुंतवणूकदारांची आणि खरेदीदारांची मागणी पुन्हा वाढू लागेल.
सोमसुंदरम, व्यवस्थापकीय संचालक, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल.

गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या दरातील घसरण कायम आहे. एकेकाळी तोळ्याला ३३ हजार रुपये असे सर्वोच्च टप्प्याला असलेले सोने आता त्यापासून खूपच लांब आहेत.
आनंद जेम्स,जिजोजित बीएनपी पारिबास.