गेल्या वर्षीच्या ३० हजार रुपयांच्या तुलनेत तोळ्यासाठी २७ हजार रुपयांच्या आसपास असलेला सोन्याचा भाव यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला चांगलाच फळलेला दिसला. लग्न हंगामाची हीच सुरुवात असल्याने यंदाच्या या मुहूर्ताने मौल्यवान धातूच्या मागणीत २० टक्के भर टाकली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औन्स १,२०० डॉलर असे गेल्या काही दिवसांपासून स्थिर असले तरी स्थानिक बाजारपेठेतील ‘एमसीएक्स’सारख्या बाजार मंचावर मौल्यवान धातूच्या किमती या तोळ्यामागे नाममात्र महागल्या आहेत. त्याचबरोबर किरकोळ बाजारातही सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी २७ हजार रुपयांच्या आसपास होता. सोन्याच्या किमती आधीच्या वर्षांच्या तुलनेत तब्बल १० टक्क्यांनी खाली आल्या आहेत. २०१४ च्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर सर्वोच्च अशा ३० हजार रुपयांवर होता. तर गुंतवणूक म्हणून पर्याय असलेल्या सोन्याची नाणी तसेच बार यांची विक्री यंदा २५ ते ३० टक्क्यांपर्यत वाढल्याचे सांगितले जाते.
ग्राहकांचा एकूण कल यंदा पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीकडे दिसल्याचे नामांकित सराफांनी सांगितले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तालाच लग्नाच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने दागिने मागणी नोंदली गेली. दरातील नरमाई तसेच खरेदीला सूट – सवलतींची जोड यातूनही मागणी वाढली. परिणामी मंगळवारची सोने खरेदी ही गेल्या वर्षीच्या मुहूर्ताच्या तुलनेत २० टक्के अधिक असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
मुथ्थूट एक्झिमने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या दागिन्यांची मालिका सादर करतानाच ४ टक्क्यांपर्यंतची सवलत व मासिक हप्त्यावर दागिने खरेदीची संधी उपलब्ध करून दिली होती. टीबीझेडसारख्यांकडून घडणावळीवर थेट ५० टक्क्यांपर्यंतची सूट तर तनिष्कने २ लाखांवरील सोन्याच्या खरेदीवर थेट २० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली होती.
शहरी तसेच ग्रामीण भागातील यंदाच्या सोने खरेदीचे चित्र स्पष्ट करताना पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या ‘कमॉडिटी’ विभागाचे तज्ज्ञ अमित मोडक म्हणाले की, शहरी भागातील सोने खरेदीचा कल हा वाढताच होता. मात्र ग्रामीण भागात विक्री यंदा १० टक्क्यांपर्यंत घसरली. गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर असलेल्या धातू दरांमुळे तसेच ऐन लग्नसराईमुळे गुंतवणूक म्हणून व दागिन्यांसाठी शहरी भागातून वाढती मागणी मंगळवारी नोंदविली गेली. जिओफिन कॉमट्रेडचे संशोधक प्रमुख हरीश व्ही. म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर असतानाही स्थानिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमती किरकोळ वाढल्या आहेत.

शहरात मागणीला बहर, ग्रामीण भागात अवकळा
‘अखिल भारतीय रत्न व दागिने व्यापार परिषदे’चे अध्यक्ष मनीष जैन यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दागिन्यांची विक्री १० ते १२ टक्क्यांनी अधिक झाल्याचे म्हटले आहे. तर सोन्याच्या दरातील घसरण ही वार्षिक तुलनेत १० टक्के याच प्रमाणात राहिली असून गुंतवणूक म्हणूनही काही प्रमाणात सोने खरेदी झाल्याचे ते म्हणाले. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आम्ही १५ ते २० टक्के अधिक विक्री नोंदिवली आहे, अशी माहिती तारा ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव शेठ यांनी दिली. दागिन्यांमध्ये बांगडय़ा, कंठहार तसेच वजनाला हलक्या व दिसायला आकर्षक अशा दागिन्यांची मागणी ग्राहकांकडून होत आहे, असेही ते कल विशद करताना म्हणाले. मात्र अवकाळी पाऊस, गारपिठीमुळे ग्रामीण भागात विक्री यंदा १० टक्क्यांपर्यंत घसरली, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या अमित मोडक यांनी सांगितले.