सोने मागणीला २०१६च्या सुरुवातीला जगभरात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी भारतासाठी पहिली तिमाही निराशाजनक ठरली आहे.
जानेवारी ते मार्च या २०१६ मधील पहिल्या तिमाहीत जगभरातील सोने मागणी १,२९० टनवर पोहोचताना त्यात वार्षिक तुलनेत २१ टक्के वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर गोल्ड ईटीएफलाही तब्बल ३६४ टनमध्ये प्रतिसाद मिळाला आहे.
भारताने २०१६च्या पहिल्या तिमाहीत ११६.५ टन सोने मागणी नोंदविली असून वार्षिक तुलनेत त्यात तब्बल ३९ टक्के घसरण झाली आहे. केंद्र सरकारच्या मौल्यवान धातूवरील एक टक्का उत्पादन शुल्क विरोधात सराफांनी केलेल्या ४२ दिवसांच्या आंदोलनामध्ये मार्च महिन्याचा समावेश होता. परिणामी यंदा मागणी कमी झाली आहे. जानेवारी ते मार्च २०१५ मध्ये भारताची सोने मागणी १९१.७ टन होती.
मूल्याबाबत पहिल्या तिमाहीत भारताची सोने मागणी ३६ टक्क्यांनी रोडावत २९,९०० कोटी रुपयांवर आली आहे. आधीच्या वर्षांत याच कालावधीत ती ४६,७३० कोटी रुपये होती. चालू संपूर्ण वर्षांत भारत ९५० टनपर्यंत सोने मागणी नोंदविण्याबाबतचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. दागिने मागणीही ४१ टक्क्यांनी कमी होत ती ८८.४ टनवर आली आहे. या कालावधीत सोने आयात ३० टक्क्यांनी कमी झाली असली तरी संपूर्ण वर्षांत ती १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
सराफांच्या आंदोलनाचा विपरीत परिणामी मौल्यवान धातू मागणीवर झाल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेचे (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत नमूद केले. परिषदेमार्फत मौल्यवान धातूच्या चालू वर्षांच्या पहिल्या तिमाहीचा मागणी आढावा घेण्यात आला आहे. तिमाहीच्या सुरुवातीपासून २ लाख रुपयांवरील सोने खरेदीकरिता अनिवार्य करण्यात आलेल्या पॅन नोंदणीनेही धातू खरेदीकडे कमी ग्राहक, गुंतवणूकदार वळल्याचे सोमसुंदरम म्हणाले. दुसऱ्या तिमाहीबाबत या क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.