मुंबई : सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये सोमवारी मोठी वाढ नोंदली गेली. परिणामी सोने तोळ्यासाठी २७,६०० च्याही पुढे गेले आहे, तर चांदीच्या किलोच्या भावाने सप्ताहारंभीच ४० हजाराचा पल्ला गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गेल्या तीन महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. सोमवारी मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर हे १८५ रुपयांनी वाढून २७,६३० रुपयांपर्यंत गेले. तर शुध्द सोन्याचा याच वजनाचा दर त्याच प्रमाणात वाढत २७,७८० रुपयांपर्यंत गेले. सोमवारची पांढऱ्या धातूची चकाकी लक्षणीय ठरली. किलोसाठी चांदीचे मूल्य एकदम ४६० रुपयांनी वाढून ४० हजार रुपयांपल्याड, ४०,६४० रुपयांवर गेले. गेल्या सप्ताहअखेर चांदी ४० हजार रुपयांच्या आसपास होती.
रुपयात पुन्हा घसरण; तीन सत्रांतील तेजी निमाली
मुंबई : डॉलरच्या तुलनेत गेल्या सलग तीन व्यवहारांपासून भक्कम होत असलेल्या रुपयाने सोमवारी अमेरिकी चलनासमोर अखेर नांगी टाकली. २१ पैशांनी रोडावत रुपया सप्ताहारंभी ६३.७२ पर्यंत घसरला. भांडवली बाजारासह अन्य व्यवहाराकरिता बँक तसेच आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयावर दबाव निर्माण झाला. नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना रुपया सोमवारी ६३.४५ पर्यंत उंचावला होता. तर व्यवहारात त्याचा तळ ६३.७३ राहिला. दिवसअखेर तो शुक्रवारच्या तुलनेत ०.३३ टक्क्य़ाने घसरताच राहिला. गेल्या सप्ताहअखेर स्थानिक चलन ६३.५१ वर विसावले होते. याच आठवडय़ात रुपयाने ६४ पर्यंत घसरण नोंदवित चिंता वाढविली होती.