तिमाहीत मौल्यवान धातू मागणी दुप्पट

नुकत्याच संपलेल्या तिमाहीत देशाची सोने आयात दुप्पटीहून अधिक झाली असून जून २०१७ अखेर ती ११.२५ अब्ज डॉलर झाली आहे. ओणमपासून सुरू होणाऱ्या सणांच्या हंगामात मौल्यवान धातूकरिता ग्राहकांकडून खरेदी वाढण्याच्या पाश्र्वभूमीवर सोन्याची मागणी नोंदविली गेली आहे.

एप्रिल ते जून २०१७ दरम्यान सोन्याची आयात ११.२५ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ४.९० अब्ज डॉलर होती, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

गेल्या तिमाहीतील अखेरच्या महिन्यात सोन्याची आयात १.२० अब्ज डॉलरवरून २.४५ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. वाढत्या मौल्यवान धातूच्या आयातीमुळे आयात-निर्यातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट जूनमध्ये १२.९६ अब्ज डॉलरवर गेली आहे. जून २०१६ मध्ये ती ८.११ अब्ज डॉलर होती. जून २०१७ मध्ये चांदीची आयात मात्र २८.६ टक्क्यांनी घसरून १७.८ कोटी डॉलर झाली आहे.

चीननंतर सर्वाधिक मौल्यवान धातूचा भारत हा दुसरा ग्राहक देश आहे. भारतात सोने आयातीवर १० टक्के कर आहे.

चलनात सध्या ८५ टक्के नोटा

नवी दिल्ली : निश्चलनीकरणापूर्वी चलनात असलेल्या नोटांच्या तुलनेत ८५ टक्के नोटा सध्या असल्याची माहिती संसदेत देण्यात आली.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. निश्चलनीकरणापूर्वी चलनात असलेल्या नोटांपैकी सध्या असलेल्या नोटांचे प्रमाण ८५ टक्क्यांहून अधिक असल्याचे ते म्हणाले.

२८ ऑक्टोबर २०१६ रोजी चलनात १७,५४०.२२ अब्ज रुपयांच्या नोटा होत्या. २३ जून २०१७ मध्ये ते १५,०७४.४३ अब्ज रुपयांच्या नोटांपर्यंत आल्याचे अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले. चलनात अधिकाधिक नोटा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.देशाच्या विविध भागांत चलनांचा पूर्ववत पुरवठय़ावर सरकारचा भर असून त्यासाठी सरकार, रिझव्‍‌र्ह बँक पातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे मेघवाल म्हणाले.८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. यानंतर नव्या ५०० रुपयांच्या नोटा सादर करण्यात आल्या. त्याचबरोबर २,००० रुपयांची नोट प्रथमच चलनात आणली गेली.