सोने धातूला मिळणारा नवा गुंतवणूक चेहरा यंदाच्या ऐन दिवाळीच्या सणांमध्ये अधिक स्पष्ट होणार आहे. सोने मुद्रणीकरण आणि सुवर्ण रोखे योजना येत्या महिन्यात सादर करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.
सरकारच्या तिजोरीवर भार ठरणाऱ्या वाढत्या सोने आयातीला पायबंद घालण्याकरिता तसेच घरांमध्ये साठवून ठेवलेल्या मौल्यवान धातूला गुंतवणुकीचा वर्ख लागण्यासाठी संसदेत सादर झालेल्या चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात या योजनांबाबत सर्वप्रथम सूतोवाच केले गेले होते.
याबाबतच्या प्रस्तावाला गेल्या महिन्यात मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात सोने गुंतवणूक योजना कशी असावी, यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेबरोबर बैठक झाल्याचे अर्थ व्यवहारमंत्री शक्तिकांता दास यांनी सांगितले.
सोने मुद्रणीकरण आणि सोने रोखे योजनांबरोबरच अशोकचक्राचे बोधचिन्ह असलेल्या सुवर्ण मुद्राही सरकार येत्या महिन्यात सादर करेल, असेही दास म्हणाले. याबाबतची प्रक्रिया एमएमटीसी पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोने मुद्रणीकरण योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारचे सोने हे बँकेमध्ये १ ते १५ वर्षांपर्यंत ठेवल्यास त्यावर व्याज मिळणार आहे. तर ५, १०, ५० व १०० ग्रॅम वजनाच्या प्रमाणात मूल्य असलेल्या ५ ते ७ वर्षे मुदतीच्या सुवर्ण रोख्यांवर ठरावीक वार्षिक व्याज मिळेल. यामार्फत चालू आर्थिक वर्षांत १५,००० कोटी रुपये उभारले जातील, असा अंदाज आहे. केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती ५०० ग्रॅमपर्यंतच्या मूल्यातील गुंतवणूकच या रोख्यांमध्ये करता येणार आहे.
ऐन सण-समारंभात सोन्याची वाढती आयात लक्षात घेऊन याच मोसमात ही योजना सादर करण्याचा सरकारचा मनोदय आहे. सणातील धातूची मागणी पाहता ऑगस्टमध्येच १२० टन सोने आयात झाले आहे. भारतात दरवर्षी सरासरी १,००० टनपर्यंत सोन्याची आयात होते.