सलग सातव्या व्यवहार दरातील चकाकी कायम राखणाऱ्या सोने धातूने मंगळवारी त्याचा तोळ्यासाठीचा २८ हजार रुपयांचा टप्पाही पार केला, तर किलोसाठी चांदीचा दरही ३७ हजार रुपयांच्या वर गेला. सोने दराची मंगळवारची पातळी ही गेल्या वर्षभरातील सर्वात मोठी राहिली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या अस्वस्थतेने खरेदीदारांनी मौल्यवान धातूंचा साठा करण्याकडे दाखविलेला कल दरांमध्ये अनोखी चकाकी निर्माण करणारा ठरला. त्यातच लग्नादी समारंभांचा मोसमवेग लक्षात घेतही व्यापाऱ्यांनी धातूंच्या खरेदीकरिता जोर लावला.

स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोने धातूचा दर मंगळवारी तोळ्यामागे २२० रुपयांनी वाढून २८ हजारानजीक, २७,९९५ रुपयांपर्यंत पोहोचला, तर शुद्ध सोने याच प्रमाणात वाढत प्रति १० ग्रॅम २८,१४५ रुपयांपर्यंत गेले.

चांदीचा ३६,३९० रुपये हा सोमवारचा किलोचा भाव दुसऱ्या दिवशीच्या व्यवहारात ३८ हजार रुपयांनजीक जाताना ३७,१७५ रुपयांपर्यंत गेला. एकाच सत्रात त्यात किलोमागे तब्बल ७८५ रुपयांची वाढ झाली. सोमवारी  तोळ्यामागे ४३० रुपयांची झेप घेणाऱ्या स्टॅण्डर्ड सोन्याचा दर हा ३१ जानेवारी २०१५ नंतरचा सर्वोच्च ठरला.

चांदीचा भावही सोमवारच्या व्यवहारात किलोमागे १,०१० रुपयांनी वाढले होते.

रुपयात तीव्र घसरण

डॉलरच्या तुलनेत ६८ च्या खालचा प्रवास नोंदविणाऱ्या स्थानिक चलनाने मंगळवारी कमालीची अस्वस्थता निर्माण केली. विदेशी चलन विनियम व्यासपीठावर रुपया सोमवारच्या तुलनेत दिवसअखेर ४ पैशांनी उंचावला असला तरी सत्रात त्याने ६८.२२चा तळ अनुभवला.  शेअर बाजारातील समभाग विक्रीमुळे  विदेशी गुंतवणूकदारांची डॉलरची मागणी वाढली.  निर्यातदारांचीही त्याला साथ मिळाली. रुपयाचा सध्याचा किमान प्रवास हा डिसेंबर २०१४च्या समकक्ष आहे. गेल्या दोन व्यवहारातील रुपयातील कमकुवतता ही ३९ पैशांची राहिली आहे.