शेअर बाजार विदेशी घडामोडींनी झोपवला जात असल्याने, गुंतवणूकदार पुन्हा सोने-चांदी या पारंपरिक व अस्थिरतेच्या स्थितीत अक्षय्य मूल्य असलेल्या गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसून येत आहे. गेले काही दिवस लग्नसराईमुळे वाढलेल्या मागणीनेही सराफा तेजी सुरू असून, गुरुवारी सोने-चांदी दराने अकस्मात मोठी उसळी घेतली. स्टँडर्ड सोने तोळ्यामागे एकदम ९४५ रु. (३.३८ टक्के) वाढून मे २०१४ पूर्वी अनुभवलेल्या २९ हजाराच्या वेशीवर (२८,८३५ रुपयांवर) पोहोचले. चांदीही किलोमागे १,२१५ रुपयांनी वाढून ३८,००० रुपयांवर गेली आहे.

रुपया २९ महिन्यांपूर्वीच्या तळाला
मुंबई: भांडवली बाजारातील तीव्र पडझडीच्या परिणाम रुपयाच्या विनिमय मूल्यावरही गुरुवारी जाणवला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ते तब्बल ४५ पैशांनी घसरून ६८.३० या पातळीवर दिवसअखेर स्थिरावले.
विदेशी गुंतवणूकदार स्थानिक बाजारातून निरंतर निर्गुतवणूक करीत असून, हा पैसा देशाबाहेर नेताना त्यांच्याकडून वाढलेल्या डॉलरच्या मागणीचा रुपयाच्या मूल्यावर दबाव दिसून येते आहे.
गेल्या काही दिवसांत सरासरी १००० कोटी रुपये अशा प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांची बाजारात समभाग विक्री सुरू आहे.