चांदीचा किलोचा भाव ४२ हजारावर
अक्षय तृतिया हा सुवर्णखरेदीचा एक मुहूर्त आठवडाभर नजीक असताना सोने धातूने सोमवारी तोळ्यासाठी ३० हजार रुपयांना गवसणी घातली.
मौल्यवान धातू दर आता गेल्या दोन वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.
लग्नादी मुहूर्ताच्या भरगच्च तारखा आणि येत्या सोमवारी येणारी अक्षय तृतिया यामुळे धातूंचे दर अल्पावधीत कमालीचे वाढले आहेत.
स्टॅण्डर्ड सोने सप्ताहारंभीच प्रति १० ग्रॅमसाठी एकदम ४९० रुपयांनी उंचावत थेट ३०,३१० रुपयांपर्यंत गेले. तर शुद्ध सोन्याचा तोळ्यासाठीचा भावही जवळपास ५०० रुपयांनीच वाढत ३०,४६० रुपयांवर गेला.
गेल्या सप्ताहात किलोसाठी ४०,००० रुपयापुढील प्रवास नोंदविणाऱ्या चांदीच्या दरात सोमवारी किलोकरिता ४३५ रुपयांची वाढ राखली गेली. यामुळे पांढरा धातू ४२,३१० रुपयांपर्यंत गेले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औन्स १,३०० डॉलर पल्याड गेले आहेत.
एक टक्का उत्पादन शुल्कविरोधात एक महिन्यांहून अधिक कालावधीसाठी देशभरातील सराफा दालने बंद राहिल्यानंतर मौल्यवान धातूंना ते सुरू झाल्याने पुन्हा एकदा मागणी आली आहे. अल्पावधीत ग्राहकांची धातूची मागणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सराफांसमोर आहे.
दरम्यान, दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सप्ताहारंभी परकी चलन विनिमय मंचावर ११ पैशांनी रोडावले. रुपया ६६.४४ वर स्थिरावला. भांडवली बाजाराप्रमाणेच येथेही चलनात घसरण झाली. गेल्या सप्ताहाची अखेर करताना रुपया १९ पैशांनी भक्कम बनला होता.