चांदीचा भाव ३५ हजारांखाली
सण-समारंभांचे दिवस सरले आणि लागलीच मौल्यवान धातूंच्या भावातील नरमाईही अनुभवली जात आहे. मंगळवारी सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये झालेल्या मोठय़ा घसरणीने या धातूंचे भाव आता मागील तीन महिन्यांच्या नीचांकाला गेले आहेत.
मुंबईच्या घाऊक बाजारात स्टॅण्डर्ड (९९.५) सोन्याचा तोळ्याला भाव मंगळवारी एकदम २६५ रुपयांनी कमी होत २५,३२५ रुपयांवर येऊन ठेपला. तर शुद्ध प्रकारच्या (९९.९) प्रकारच्या सोने १० ग्रॅमसाठी त्याच प्रमाणात कमी होऊन २५,४७५ रुपयांवर स्थिरावल्याचे आढळून आले.
चांदीच्या दरांमध्येही मंगळवारी लक्षणीय घट नोंदली गेली. किलोमागे ३४० रुपयांची घसरण होत पांढऱ्या धातूने त्याचा ३५ हजारांचा स्तरही सोडला. चांदी दिवसअखेर ३४,७६५ रुपयांवर स्थिरावली. मंगळवारअखेरचा सोन्याचा दर हा गेल्या तीन महिन्यांतील सर्वात कमी दर राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने प्रति औन्स १,१०० च्या खाली उतरले आहे.