वर्ष २०१५ची सांगता करताना सोने प्रति तोळा २५ हजाराच्याही खाली उतरले. तर संपूर्ण वर्षांत हा मौल्यवान धातू प्रति १० ग्रॅमकरिता १,७४० रुपयांनी स्वस्त झाला आहे. एकाच वर्षांतील सोन्यातील ही घसरण तब्बल ६.५१ टक्क्यांची आहे.
२०१५ मध्ये या मौल्यवान धातूच्या झळाळीला सलग तिसऱ्या वर्षांत डाग बसला आहे. सरकारने आयातीबाबत कठोर र्निबध, वाढते आयात शुल्क आणि अखेरच्या टप्प्यात आलेल्या सोनेनिगडित बचत योजना यामुळे हे वर्ष या क्षेत्राभोवती चर्चेत राहिले. वाढत्याला आयातीला रोखून सरकारच्या तिजोरीवरील भार या वर्षांत मोठय़ा प्रमाणात हलका झाला. सोन्याची मागणी ऐन सणासुदी आणि लग्नाच्या मोसमातही वाढू शकली नाही.
सोन्याबरोबच चांदीच्या दरांमध्येही वर्षभरात जवळपास १० टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर प्रति औन्स १,१०० डॉलरखाली या वर्षांत उतरल्याचे अनुभवले गेले. सोन्याने भारतीय बाजारपेठेत २०१५ मध्ये २७ हजारापुढील मजल मारलीच नाही. तर चांदीचा किलोचा भावही संपूर्ण वर्षभरात ३८,००० रुपयांपुढे जाऊ शकला नाही. पांढऱ्या धातूचा सर्वोच्च दर जवळपास ७० हजारांपुढे गेला आहे.