लग्नसराईच्या निमित्ताने तोळ्यासाठी ३१ हजार रुपयांच्या पुढे असलेले सोन्याचा भाव बुधवारी मुंबईच्या सराफा बाजारात लक्षणीयरित्या खाली आला. स्टॅण्डर्ड तसेच शुद्ध सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ६३० ते ६३५ रुपयांनी उतरताना पाहायला मिळाला. तर चांदीचा प्रति किलो भावही आज तब्बल दीड हजाराने कमी झाला.
दिवाळीनंतर सुरू झालेल्या लग्नाच्या मुहूर्तामुळे मौल्यवान पिवळ्या धातूच्या खरेदीचा ओघ गेल्या काही दिवसांमध्ये वाढला होता. परिणामी १० गॅ्रमसाठी सोन्याचा दर ३२ हजार रुपयांची वेस ओलांडताना दिसला. गेल्या काही सत्रांपासून तर सोन्याचा भाव तोळ्यामागे ३० हजाराच्या वर कायम होता. बुधवारी मात्र जागतिक बाजारातील चिंतेने स्थानिक सराफा बाजारातही विपरीत हालचाल दिसून आली. यामुळे शहरात स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा भाव रु. ३०,५४०, तर शुद्ध सोन्याचा भाव रु. ३०,६७० वर उतरला. दोन्ही प्रकारात अनुक्रमे ६३५ व ६३० रुपयांची घसरण नोंदली गेली.
याचबरोबर चांदीचा भावही किलोसाठी १,६२५ रुपयांनी कमी होत ६०,१७० रुपयांवर आला. मंगळवारी चांदीचा किलोचा भाव ६१,७९५ रुपये होता. दोन्ही मौल्यवान धातू गेल्या दीड महिन्याच्या नीचांकावर येऊन ठेपले आहेत.     

रुपया वधारला
मुंबई : गेल्या सलग पाच सत्रातील घसरण बुधवारी थांबताना डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी वधारला. यामुळे भारतीय चलन ५४.५५ वर गेले आहे. बँकिंग सुधारणा विधेयक पारित झाल्यामुळे भारतीय बँकांमध्ये अधिक भांडवल येण्याच्या आशेने बँक तसेच निर्यातदारांकडून अमेरिकन डॉलरची खरेदी वाढल्यामुळे रुपया भक्कम झाला. रुपयाच्या तेजीला भांडवली बाजारातील  निर्देशांकाच्या बुधवारच्या शतकी वाढीनेही हातभार लावला. दिवसभरात डॉलरच्या तुलनेत ५४.५१ ते ५४.९३ असा प्रवास करणारा रुपया अखेर अर्धा टक्क्याने    वधारला.