सोने व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या सराफांच्या एकदिवसीय बंदला ९० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला गेला आहे. ‘इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन’ (आयबीजेए) या सराफ क्षेत्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने बंदची हाक दिली होती.
तथापि सरकारच्या धोरण प्रतिकूलतेत सुधाराची आशा मावळली असून, आचारसंहिता लागू झाल्याने केंद सरकारमधील अनेक मंत्र्यांची अनुकूलता असली तरी आयात शुल्कात कपातीचा निर्णय जूनमध्ये येणाऱ्या नवीन सरकारकडून घेतला जाईल.
सराफांचे नेतृत्व करणाऱ्या ‘आयबीजेए’चे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी दिलेला माहितीनुसार, बंददरम्यान मुंबईसह महाराष्ट्र तसेच कोलकत्त्यात व्यवहार ठप्प राहिले. सोन्यावरील आयातशुल्क वाढविल्यानंतर सराफांना विविध सरकारी पातळीवर अधिकाऱ्यांचा नाहक त्रास होत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे. सोने वापरावरील र्निबध लगेच दूर सारून चोरटय़ा मार्गाने वाढणाऱ्या सोने आयातीवर अंकुश आणण्याची संघटनेची मागणी आहे.