दागिने निर्यातीत २५.४७ टक्क्यांनी घट

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांची निर्यात २५.४७ टक्क्यांनी घटली असून, याचा सर्वाधिक जाच सुवर्ण रचनाकार आणि दागिने कामगारांच्या रोजीरोटीवर होत आहे. या कामगारांची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये ६० टक्क्यांनी घटली असून, परिस्थिती खालावण्याची भीती ‘ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशन’ने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने कामगार कल्याणासाठी राखीव ८०० कोटी रुपयांमधून दागिने कामगारांसाठी प्रशिक्षण आणि प्रदर्शन केंद्र उभारण्याची विनंतीही असोसिएशनने केली आहे.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ६ ते ७ टक्के योगदान आभूषण क्षेत्राचे राहिले आहे. पण आता हेच क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहे, अशी असोसिएशनची खंत आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट कौन्सिल (जीजेईपीसी)ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या दागिन्यांची निर्यात चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या पाच महिन्यांमध्ये (एप्रिल ते ऑगस्ट) २५.४७ टक्क्यांनी घटून २.८४ अब्ज डॉलर झाली आहे. गतवर्षी याच काळात ती ३.८२ अब्ज डॉलर एवढी होती.

दागिने घडविणाऱ्या कामगारांची संख्या दहा वर्षांपूर्वी ५ लाख होती ती दोन लाख घटली आहे. गेल्या दहा वर्षांत त्यात तब्बल ६० टक्क्यांनी घट झाली आहे, असे ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक सदस्य संजय शाह यांनी सांगितले. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाला असून या परिस्थितीत, या कामगारांची स्थिती आणखी हलाखीची होत चालली आहे. कमी झालेली कमाई आणि प्रशिक्षणाचा अभाव ही त्यामागची काही महत्त्वाची कारणे असल्याची त्यांनी पुस्ती जोडली.

‘जीजेईपीसी’ने सुवर्ण कारागिरांचे जीवनमान सुधारण्यासाठी निधी उभारणीचा उपक्रम हाती घेतला आहे आणि त्यासाठी तीन दिवसांचे ‘ज्वेलरी अँड लाइफस्टाइल’ प्रदर्शन मुंबईत आयोजित केले गेले. कामगारांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन घडविण्यासाठी आणि त्याला उचित मूल्य मिळविण्यासाठी प्रदर्शनस्थळाचे नियोजन करावे, अशीही असोसिएशनची मागणी आहे.