सुंदर पिचई यांनी गुरुवारी बैठक बोलाविली; कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार

लिंगभेदाचे कथित समर्थन करणारा  अभिप्राय देणाऱ्या ‘गुगल’मधील पुरुष अभियंत्यास अखेर हकालपट्टी करण्यात आली असून, गुगलने या ऑनलाइन निवेदनाला आमचा पाठिंबा नाही, असे जाहीर केले आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी या निवेदनाचा सोमवारी ईमेलद्वारे निषेध केला असून, लिंगभेद खपवून घेतला जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

खळबळ माजविणाऱ्या या वेगवान घडामोडींनंतर पिचई यांनी आपली सुटीतील दौरा आटोपता घेतला असून, गुरुवारी ते या प्रकरणी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. अभियंता जेम्स डॅमोर याने आक्षेपार्ह निवेदन ईमेलवरून प्रसारित केले होते ते ब्लूमबर्गच्या हाती लागले असून त्याच्या हकालपट्टीच्या वृत्तालाही वृत्तसंस्थेने दुजोरा दिला आहे. गुगलने मात्र डॅमोरनेच हे कृत्य केले किंवा काय यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘गुगल्स आयडिऑलॉजिक इको चेंबर’ या मथळ्याखाली या अभियंत्याने हे कथित वादग्रस्त निवेदन जारी केले होते, त्यात महिला कर्मचाऱ्यांना महत्त्वाची पदे मिळत नाहीत यासाठी जैविक कारणे असल्याचे म्हटले होते. या संबंधाने गुगलने योजलेल्या कार्यक्रमांवरही त्याने टीका केली आहे. गुगलच्या विविधता प्रमुख डॅनिएली ब्राऊन यांनी सांगितले, की विविधतेवर कंपनीचा विश्वास आहे. जे निवेदन या अभियंत्याने तयार केले ते निषेधार्ह आहे.

या कर्मचाऱ्याचे निवेदन गिझ्मोडो या तंत्रज्ञान ब्लॉगवर प्रसिद्ध झाले असून, महिला व पुरुष यांच्यातील फरकांमुळे महिलांना तंत्रज्ञान कंपन्यात मोठी पदे मिळत नाहीत असे त्यात म्हटले आहे. तंत्रज्ञान कंपन्यांत वरिष्ठ पदांवर पन्नास टक्केही महिला नाहीत, त्यामागे जैविक कारणे असून महिला केवळ  सौंदर्याला महत्त्व देतात, त्यामुळे त्यांनी सामाजिक व कला क्षेत्रात काम करावे असा सल्ला त्यात त्याने दिला आहे. क्लिष्ट स्वरूपाचे ‘कोडिंग’ केवळ पुरुषांनाच जमते असा दावाही त्यात होता.

  • गुगलमध्ये मोठय़ा पदांवर महिला कमी आहेत. एकूण कर्मचाऱ्यांत ५६ टक्के श्वेतवर्णीय व ३५ टक्के आशियन, तर ४ टक्के हिस्पॅनिक व २ टक्के कृष्णवर्णीय आहेत.
  • सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांत लिंगभेद मोठय़ा प्रमाणावर आहे; महिलांना दुजाभावाची वागणूक दिली जाते अशी चर्चा आधीपासून होती, त्यानंतर गुगलने महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते किंवा काय या मुद्दय़ावर चौकशी सुरू केली आहे.