वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन बाजारपेठेत अमेरिकेच्याच अ‍ॅपल व कोरियाच्या सॅमसंगसमोर टिकाव लागणार नाही, हे दोन वर्षांनंतर कळून चुकलेल्या गुगल या आघाडीच्या सर्च इंजिन कंपनीने मोटोरोला ही अधिग्रहित मोबाईल कंपनी अखेर चीनच्या लिनोव्होच्या हवाली केली आहे. या माध्यमातूून आठवडय़ातील दुसरा ताबा व्यवहार करणाऱ्या लिनोव्होला स्वदेशी बनावटीच्या हुवेई, झेडटीईला अधिक जोमाने टक्कर देता येईल. लिनोव्होने हा व्यवहार मार्गी लावल्याने तिच्याकडून ब्लॅकबेरीच्या संभाव्य खरेदीच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
लिनोव्हो ही चीनमधील आघाडीची संगणक निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाते. तेथील हुवेई, झेडटीई या कंपन्या चीनच्या स्मार्टफोन क्षेत्रात पहिल्या दोन क्रमांकाच्या आहेत. तर जागतिक स्तरावर कोरियाची सॅमसंग आणि अमेरिकेच्या अ‍ॅपलनंतर हुवेई ४.९ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर, तर ४.५ टक्के बाजारहिश्श्यासह लिनोव्हो पाचव्या स्थानावर आहे. काही महिन्यांपूर्वीच स्मार्टफोन क्षेत्रात अवतरणाऱ्या या चिनी कंपनीला आता मोटोरोलामुळे देशी स्पर्धक हुवेईला मागे टाकण्यासह सॅमसंग आणि अ‍ॅपलजवळ जाता येणार आहे.
२०१२ च्या अखेरीस गुगलने मोटोरोलाचा मोबाइल व्यवसाय १२.५ अब्ज डॉलर मोजून खरेदी केला होता. आता लिनोव्होबरोबरचा गुगलचा नवा व्यवहार २.९१ अब्ज डॉलरचा झाला आहे. गुगलने नुकताच मोटोरोलाचा केबल बॉक्स व्यवसाय २.५ अब्ज डॉलरला विकला होता. या दरम्यान मोटोरोलाचा बाजार हिस्सा एक टक्क्याने घसरून २.३ टक्के झाला आहे.