भांडवली बाजारात गुंतवणूकदारांसाठी ब्ल्यू चिप ठरणाऱ्या एनटीपीसी व आयओसीतील (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन) निर्गुतवणूक करण्यास बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली. यामार्फत चालू आर्थिक वर्षांतील पहिली मोठी सरकारी हिस्सा विक्री प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

एनटीपीसीतील ५ टक्के तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील १० टक्के हिस्सा विक्रीतून १३,६०० कोटी रुपये उभारण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. २०१५-१६ साठी ४१,००० कोटी रुपये निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या अनुक्रमे ऊर्जा व तेल – वायू विपणन व विक्री क्षेत्रातील आघाडीच्या सरकारी कंपन्या आहेत. दोन्हीच्या निर्गुतवणुकीच्या निर्णयावर बुधवारी राजधानीत झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने शिक्कामोर्तब केले.
आयओसीत गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा सरकारी समभाग विकण्यास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नव्या टप्प्यात १० टक्के हिस्सा विक्रीद्वारे २४.२७ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामार्फत तेल विक्री व विपणन कंपनी ८,००० कोटी रुपये उभारेल.
तर ऊर्जा क्षेत्रातील एनटीपीसीमध्ये ५ टक्के हिस्सा विक्रीसाठी ४१.२२ कोटी समभाग भांडवली बाजारात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याद्वारे ५,६०० कोटी रुपये उभे केले जातील. यापूर्वी फेब्रुवारी २०१३ मध्ये या कंपनीतील काही सरकारी हिस्सा विकण्यात आला होता.
एनटीपीसीमध्ये सध्या सरकारचा हिस्सा ७४.९६ तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये ६८.५७ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल फर्टिलायझर्स, एमएमटीसी, हिंदुस्थान कॉपर, आयटीडीसीमध्येही निर्गुतवणूक होण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत १,५५० कोटी रुपये सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून उभारले गेले आहेत. ऊर्जा क्षेत्रातीलच आरईसीमधील ५ टक्के हिस्सा विकून ही रक्कम गेल्याच महिन्यात उभी राहिली होती. ओएनजीसी व भेलमधील प्रत्येकी ५ टक्के तर नाल्को व एनएमडीसीतील प्रत्येकी १० टक्के सरकारी हिस्सा विक्रीस यापूर्वीच मान्यता मिळाली आहे.

बाजार दफ्तरी समभागांमध्ये संमिश्र हालचाल
निगुर्ंतवणुकीच्या निर्णयानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध एनटीपीसी व आयओसी कंपन्यांचे समभाग मूल्य बुधवारी संमिश्र हालचाल नोंदविते झाले. दिवसअखेर एनटीपीसीचा समभाग २.४७ टक्क्य़ांनी घसरत १३८ रुपयांवर आला. व्यवहारात एनटीपीसी ५ टक्क्य़ांपर्यंत आपटला होता. उलट आयओसीच्या समभागाला अर्धा टक्का अधिक मूल्य प्राप्त होत समभाग ३३४.५० रुपयांपर्यंत उंचावला. तर आयओसीतील व्यवहारातील २.६२ टक्क्य़ांपर्यंतची घसरण दिवसअखेर तेजीत आली.