अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची राज्यसभेत कबुली

विदेशात भारतातील करबुडव्यांनी दडवलेल्या काळ्या पैशाची रक्कम किती याचा ठोस अंदाज सरकारने केलेला नाही, अशी स्पष्ट कबुली अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

भारतीयांनी विदेशात धाडलेला काळा पैशाबाबत चौकशी सुरू असून, प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागासह विविध तपास यंत्रणा त्या संबंधाने पाठपुरावा करीत आहेत. तथापि तपास सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये नेमकी रक्कम किती आहे, याचा एकत्रित रूपात अंदाज घेतला गेलेला नाही, असे सिन्हा यांनी लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले.

बँक ऑफ इटलीच्या अर्थतज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे ही रक्कम १५२ ते १८१ अब्ज अमेरिकी डॉलर दरम्यान आहे काय, असा प्रश्न सदस्याकडून विचारण्यात आला होता. ही रक्कम नेमकी कोणत्या आधारावर निश्चित केली गेली, त्यामागील गृहीतके पाहावी लागतील. शिवाय करबुडव्यांच्या आश्रयस्थाने असलेल्या ठिकाणच्या काळ्या पैशाचे प्रतिनिधित्व करणारा हा भारताचा वाटा आहे काय, हेही स्पष्ट नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

हे अर्थतज्ज्ञ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट (बीआयएस)कडून प्राप्त झालेल्या माहितीच्या विश्लेषणातून असे अंदाज मांडतात, त्यामागे काही विशिष्ट गृहीतके असतात. अन्य प्रकारची गृहीतके वापरात आली तर हेच अर्थतज्ज्ञ जागतिक काळे पैशाच्या साम्राज्यात भारतीयांचा वाटा हा ४ ते ५ अब्ज अमेरिकी डॉलर असेल असेही सांगतात, असा शेराही त्यांनी लगावला.