आजारी आणि तोटय़ात असलेल्या सार्वजनिक उपक्रमांच्या पुनरुज्जीवनाचे सरकारचे ‘गंभीर’ प्रयत्न सुरू असून, या कंपन्यांमध्ये निर्गुतवणूक करण्याचा सरकारचा अग्रक्रम नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी सांगितले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना गीते यांनी या आजारी उद्योगांमधील कामगारांच्या प्रश्नाबाबत सरकारला चिंता असल्याचे सांगितले. सार्वजनिक उपक्रमातील उद्योगांच्या पुनर्रचना मंडळाच्या शिफारसींनुसार, २०१३-१४ पर्यंत ४८ केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांचे पुनरुज्जीवन आणि चार कंपन्या मोडीत काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली गेली आहे. मार्च २०१३ अखेर एकूण २२९ केंद्रीय सार्वजनिक उपक्रम अस्तित्वात आहेत.
पुनरुज्जीवित करावयाच्या उद्योगांसाठी एकूण ४१,१३९ कोटी रुपयांचे आर्थिक व बिगर-आर्थिक सहकार्य दिले जाणार आहे. यापैकी रोख अर्थसाहाय्याचे प्रमाण हे ११,१३५ कोटी रुपयांचे आहे, अशी गीते यांनी माहिती दिली. हिंदुस्तान मशीन टूल्स अर्थात एचएमटी या कंपनीविषयी विचारलेल्या विशिष्ट प्रश्नावर गीते यांनी उत्तर दिले की, या कंपनीतील एकमेव नफ्यात असलेली कोचीन शाखा वेगळी काढून या कंपनीचे विभाजन करण्याचा सरकारचा मानस आहे.