क्षयरोगावरील तसेच अन्य रोगप्रतिकारक लसींच्या निर्मितीतील प्रमुख कंपनी चेन्नईस्थित ग्रीनसिग्नल बायो फार्मा लिमिटेडने प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारे भांडवली बाजारात प्रवेश प्रस्तावित केला आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांच्याकडील १० रु. दर्शनी मूल्याचे १.४५ कोटी समभागांची बुक-बिल्डिंग प्रक्रियेने विक्री करणार असून, त्यायोगे सुमारे १०० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.

ग्रीनसिग्नलची सध्या दोन प्रमुख उत्पादने असून, बीसीजी लस ही क्षयरोगाला (टीबी) प्रतिबंधासाठी तर बीसीजी-ओन्को ही मूत्राशयाच्या कर्करोगासाठी उपयुक्त आहे. बीसीजी लसींना असलेल्या मागणीच्या तुलनेत त्यांच्या निर्मितीतील जगभरातील मोजक्या कंपन्यांपैकी एक ग्रीनसिग्नल बायो फार्मा एक कंपनी आहे. जागतिक स्तरावर लसींची निर्मिती व निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारताचा लौकिक आहे. सध्या भारतात मागणी वार्षिक ८ कोटी बीसीजी लसींची असताना, पुरवठा साधारण पाच कोटी डोसांचा आहे. ग्रीनसिग्नलच्या चेन्नईस्थित लसनिर्मिती प्रकल्पाची साधारण ११ कोटी डोस निर्मितीची क्षमता असून, आगामी दोन वर्षांत हा प्रकल्प १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित होईल. शिवाय तेवढय़ाच क्षमतेचा आणखी एक प्रकल्प चेन्नईनजीक सुरू करण्याची कंपनीने योजना बनविली असून, त्यासाठी ३४ एकर जमीन संपादितही केली आहे, अशी माहिती ग्रीनसिग्नल बायो फार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. मुरली यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. कंपनीने ‘युनिसेफ’कडून तीन वर्षांसाठी लसींच्या पुरवठय़ाचे कंत्राट मिळविले असून, कंपनीच्या सध्याच्या महसुलात निर्यातीचा वाटा ६० टक्के इतका आहे. भारताच्या तुलनेत निर्यातीद्वारे तीन पटीने अधिक महसूल कंपनी मिळविते. ३१ मार्च २०१६ अखेर कंपनीने २०.४९ कोटींच्या महसुलावर ५.३० कोटींचा नफा कमावला आहे. युनिसेफच्या कंत्राटापायी कंपनीच्या महसुलात सरलेल्या वर्षांत २११ टक्क्य़ांनी वाढ झाली असून, आगामी काही वर्षांत याच वृद्धीदराने वाढ अपेक्षित असलेल्या डॉ. मुरली यांनी स्पष्ट केले. एनएसई तसेच बीएसई या दोन्ही शेअर बाजारात सूचिबद्धतेसाठी असलेली ही भागविक्री येत्या ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे.