युरोपातील प्रकल्पांसाठी २,२०० कोटी रुपयांचे कर्ज घेणाऱ्या गुजरातमधील एका व्यावसायिकाविरुद्ध कारवाई करताना अंमलबजावणी महासंचालनालयाने अमेरिकेतील १,२८० एकर जागेवर टाच आणली आहे.
झूम डेव्हलपर्स या विकासक कंपनीचे विजय चौधरी हे मुख्य प्रवर्तक आहेत. त्यांनी युरोपातील विविध प्रकल्पांसाठी गुजरातमधील बँकांकडून २,२०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र प्रत्यक्षात तेथे काहीही काम न करता अमेरिकेतील १,२८० एकर जागा खरेदी करण्यात आली. अंमलबजावणी महासंचालनालयाने ताब्यात घेतलेल्या जमिनीची किंमत सध्या १,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे मानले जाते. कंपनीचा एक संचालक शरद काबरा याला या प्रकरणात दोन महिन्यांपूर्वीच अटक करण्यात आली आहे.