विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव अंमलबजावणीत क्रमांक एकचे राज्य : आनंदीबेन पटेल

‘मेक इन इंडिया’ सप्ताह प्रदर्शनाच्या मंचावर एकाच दिवसात तब्बल ६.११ लाख कोटी रुपयांचे करार करत शेजारील गुजरातला मागे पाडून दिवस होत नाही तोच देशात सर्वाधिक व्यवसायपूरक वातावरण केवळ आपल्याच राज्यात असल्याचा दावा गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी केला. विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव आणणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे यामध्ये संपूर्ण देशात गुजरातच अव्वल असल्याचे समर्थनही त्यांनी केले.

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे यजमानपद भूषविणाऱ्या महाराष्ट्राने सोमवारी ६.११ लाख कोटी रुपयांचे २,४६३ करार सोमवारी पार पाडले होते. यामार्फत राज्यात २८ लाख रोजगार उपलब्ध होत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते.

प्रदर्शनात ‘गुजरात गुंतवणूकदार परिषदे’दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्री पटेल यांनी, गुजरात हे व्यवसायपूरक वातावरणात २०१५ मध्ये अव्वल राहिल्याचे जागतिक बँकेचा हवाला देत नमूद केले. तर राज्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ मोहिमेपासून थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण ३३ टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याकडे २२,४०३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आल्याचे नमूद करत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहा दरम्यानचे गुंतवणुकीचे लक्ष्य मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, लघू व मध्यम उद्योग, कौशल्य विकास धोरणे राबविणारे गुजरात येत्या आठवडय़ात विशेष महिला उद्यान धोरण विकसित करण्यात असल्याचे पटेल यांनी या वेळी जाहीर केले. याअंतर्गत राज्यातील हलोल व भरुच येथे १८ एकर जागेवर केवळ महिला वर्गाकरिता उद्यान असतील व त्यात उद्योगांना प्राधान्य दिले जाईल. ‘मेक इन इंडिया’ हे पंतप्रधानांनी उचललेले धाडसी पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या. गुजरात वस्त्रोद्योग, रसायन, बंदर क्षेत्रांत वरचे स्थान मिळवेल असा दावा आहे.